संग्रहित छायाचित्र
दिग्गज अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक आठ वर्षांच्या भांडणानंतर नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये एकत्र दिसले. शोच्या आगामी भागांमध्ये, गोविंदा, चंकी पांडे आणि शक्ती कपूर पाहुणे म्हणून शोचा एक भाग बनले आहेत. या एपिसोडशी संबंधित एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये गोविंदा आणि कृष्णा एकत्र नाचताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
कृष्णाची बहीण आरती सिंहदेखील शोमध्ये पोहोचली होती. मामा-भाज्याला एकत्र पाहून तीही भावूक झाली. यादरम्यान कृष्णा म्हणाला, मामा, आपण खूप दिवसांनी भेटलो आहोत, आता मी तुला जाऊ देणार नाही. पुढे गोविंदाने कृष्णाला प्रेमाने ‘गधा’ म्हटले.
गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये मतभेद होते. दोघांनी अनेकदा समेटही केला आहे. कृष्णाच्या एका वक्तव्यावरून कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील तणावाची सुरुवात झाली. २०१६ मध्ये त्याने रिॲलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये सांगितले होते की, ‘‘मी गोविंदाला माझा मामा बनवून ठेवले आहे.’’
गोविंदाला त्याची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. यावर गोविंदा म्हणाला की, ‘‘पैशासाठी टेलिव्हिजनवर कोणाचाही अपमान करू नये.’’ गोविंदाच्या या वक्तव्यावर कृष्णाने म्हटले होते की, ‘‘मी वाईट हेतूने या गोष्टी बोलल्या नाहीत.’’
२०१८ मध्ये जेव्हा कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने ट्विट केले की, ‘‘काही लोक पैशासाठी नाचतात.’’ या ट्विटमुळे दोघांमधील वाद आणखी वाढला. या ट्विटवर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा म्हणाली होती की, ‘‘हे ट्विट गोविंदाविरोधात करण्यात आले आहे. यानंतर गोविंदा आणि सुनीताने कृष्णा आणि कश्मिरासोबतचे सर्व संबंध संपवले.
२०१९ मध्ये, गोविंदा, सुनीता आणि त्यांची मुलगी टीना कपिल शर्माच्या शोमध्ये आले, तेव्हा कृष्णा शोमध्ये आला नाही. कारण सुनीताला त्याच्यासोबत स्टेज शेअर करायचा नव्हता. अलीकडे, गोविंदाला गोळी लागली होती, तेव्हा कृष्णा आणि त्याची पत्नी त्याला भेटायला गेले होते.