‘विजय ६९’च्या चित्रीकरणादरम्यान अनुपम खेर यांना दुखापत
अभिनेता अनुपम खेर हे बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. अनुपम सध्या ‘विजय ६९’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. याच ‘विजय ६९’च्या सेटवर घडलेल्या एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा खुद्द अनुपम खेर यांनी केला आहे.
अनुपम खेर यांना गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. फोटोमध्ये अनुपम यांनी उजव्या हाताला बेल्ट लावलेला दिसत आहे, तर त्यांच्या हातात व्यायामाचा चेंडूही दिसत आहे. अनुपम यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होत नाही! हे कसे होऊ शकते? काल ‘विजय ६९’च्या शूटिंगदरम्यान खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.”
अनुपम यांनी पुढे लिहिले आहे की, “दुखत आहे, पण जेव्हा सिलिंग लावणाऱ्या भावाने सांगितले की, त्याने शाहरुख खान आणि हृतिक रोशनच्या खांद्यालाही सिलिंग लावले होते, तेव्हा दुखणे थोडे कमी झाले.” अनुपम पुढे म्हणाले, “पण जेव्हा मी जोरात खोकतो, तेव्हा माझ्या तोंडातून कण्हण्याचा आवाज निघतो, पण फोटोत हसण्याचा प्रयत्न केला असून, तो खरा आहे! काही दिवसांनी शूटिंग पुन्हा सुरू होईल.”
अनुपम खेर यांच्या या फोटोवर नीना गुप्ता यांनी कमेंट केली आहे. नीना गुप्ता यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे, “अरे, तुम्ही काय केलं?” नीना गुप्ता यांना गमतीने उत्तर देत अनुपम यांनी लिहिले आहे की, “तुझ्या आणि माझ्यासारख्या महान अभिनेत्यांचे असेच होते! किरकोळ दुखापती.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.