संग्रहित छायाचित्र
टायगर श्रॉफचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बागी ४’ चांगलाच चर्चेत आहे. आता २०२१ मध्ये मिस युनिव्हर्स बनलेली हरनाज कौर संधूही या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच, निर्मात्यांनीदेखील चित्रपटात सोनम बाजवा आणि संजय दत्त काम करणार असल्याचे जाहीर केले होते.
मिस युनिव्हर्स हरनाज संधू ‘बागी ४’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हरनाजच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. पोस्ट शेअर करताना टीमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘‘मिस युनिव्हर्सपासून रिबेल युनिव्हर्समध्ये हरनाज कौरचे स्वागत आहे. चित्रपटाच्या टीमने हरनाजचे नाव रिबेल लेडी असे ठेवले आहे.’’
हरनाज याआधी २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाई जी कुटंगे’ या पंजाबी चित्रपटात आणि २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'याराँ दियां पौन बारां'मध्ये दिसली होती. ए. हर्षाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘बागी ४’मध्ये सोनम बाजवादेखील दिसणार आहे. टायगर श्रॉफने नुकताच सोनमचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत त्याने लिहिले, ‘‘रिबेल फॅमिलीत तुमचे स्वागत आहे. ‘बागी ४’मध्ये सोनमच्या एन्ट्रीबद्दल मी खूप उत्सुक आहे.’’
सोनमच्या आधी निर्मात्यांनी चित्रपटात संजय दत्तची एंट्री अधिकृत केली होती. खुद्द अभिनेत्याने चित्रपटाचे दुसरे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘बागी’चा पहिला भाग २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा तिसरा भाग २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. आता पाच वर्षांनंतर २०२५ मध्ये ‘बागी ४’ प्रदर्शित होणार आहे.
‘बागी ४’मध्ये टायगर श्रॉफ मुख्य अभिनेता म्हणून ॲक्शन करताना दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात जिमी शेरगिलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बागी ४’ पुढील वर्षी ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.