आणखी एक लव्ह लेटर

तब्बल २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर जॅकलीन फर्नांडिसला सातत्याने प्रेमपत्रे पाठवत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Wed, 21 Feb 2024
  • 11:34 am
Anotherloveletter

आणखी एक लव्ह लेटर

दिवाळी असो किंवा कोणताही कार्यक्रम, सुकेश सतत जॅकलीनला पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त करतो. आता व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सुकेशने पुन्हा एक पत्र पाठवले आहे,

सुकेश आपल्या प्रेमपत्रात लिहितो, ‘‘बेबी, मला तुझी खूप आठवण येते. व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवसापासून मी प्रत्येक क्षणी तुझा विचार करतो. आपण एकमेकांपासून दूर असताना हा दुसरा व्हॅलेंटाईन डे आहे. पण हे फार काळ चालणार नाही. हे आपले वर्ष आहे, ज्यामध्ये आपण आपल्या सभोवतालच्या सर्व नकारात्मकता आणि अडचणी दूर करू. माणूस म्हणून आपण प्रतिक्रिया देतो, दिशाभूल करतो, भडकावतो, भडकतो, चुकीची पावले उचलतो, हृदय आणि मन वेगवेगळे सल्ले देत असतो, पण शेवटी आपण हृदयाचे ऐकतो.’’ मीदेखील इतरांपेक्षा वेगळा नाही. मीदेखील माणूस आहे, मीदेखील प्रतिक्रिया देतो आणि तुझ्यापासून दूर जातो. मला वाटते की माझा विश्वासघात केला जात आहे.  माझ्या हृदयातून आवाज येतो की मी तुला कसे दुखवू शकतो? ज्याच्यावर जास्त प्रेम करतो त्याला आपण दुखवू शकत नाही. मी माघार घेतो आणि स्वतःवर रागावतो, असे नमूद करत सुकेशने जॅकलीनची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

सुकेशने त्याच्या प्रेमपत्रात ‘गोल्ड डीगर’चाही उल्लेखही केला आहे. त्याने लिहिले आहे की,‘‘'गेल्या काही दिवसांत जे लोक आपणा दोघांना ओळखत होते ते सर्व काही चुकताना पाहत मजा घेत आहेत. विशेषतः ज्यांना मी गोल्ड डीगर म्हणतो. त्यांनी अप्रत्यक्षपणे मला तुझ्याविरोधात भडकावण्याचा मेसेजही केला आहे, पण त्या गोल्ड डीगरना हे समजत नाही की मी इतक्या सहज गोष्टींनी भुलू शकणारा माणूस नाही.’’ पत्राच्या शेवटी सुकेशने तू मान मेरी जान हे गाणे जॅकलीनला समर्पित केले आहे.

दोन वर्षांपूर्वी सुकेश चंद्रशेखरला २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान सुकेशने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे. यावेळी त्याने जॅकलीनला त्याची गर्लफ्रेंड म्हटले होते. या दोघांचे काही खासगी फोटोही समोर आले होते, मात्र जॅकलीनने सुकेशसोबत कधीच संबंध असल्याचे कबूल केले नाही.

पुढे, अंमलबजावणी विभागाने नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू केली होती. सुकेश हा फसवणूक करणारा आहे हे तिला माहित नव्हते, असे जॅकलीनने चौकशीदरम्यान सांगितले. तेव्हापासून ठग सुकेश चंद्रशेखर जॅकलीनला पत्र लिहून प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये, जॅकलीनने सुकेश चंद्रशेखरविरोधात फसवणूक आणि मीडियाद्वारे तिची प्रतिमा डागाळल्याबद्दल उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता, तथापि, या महिन्यात तिने केस मागे घेतली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story