आलिया झाली पुन्हा ट्रोल !
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आलिया भट्ट हिचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून २०१२ मध्ये आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या दहा वर्षांच्या काळात आलियाने बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही जागतिक दिवसांपूर्वीच आलिया भट्टचे नाव ‘गुची’ या जागतिक ब्रॅण्डसाठी वर्ल्ड ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. अम्बॅसिडर झाल्यावर अलीकडेच आलियाने ‘गुची’ ब्रॅंडच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यावेळी आलियाने लैंगिक समानता या विषयावर आपले मत मांडले. हा व्हीडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
गुची ब्रॅण्डच्या कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्टने लैंगिक समानता या विषयावर जे भाष्य केले त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना आलियाने उत्स्फूर्तपणे आपले मत मांडण्याऐवजी केवळ लिहून दिलेले भाषण वाचले आहे असे वाटते आहे. तिच्या भाषणात आलिया म्हणाली होती की, जर एखादी महिला सक्षम असेल, तर ती संपूर्ण घरात, तिच्या मुलांसाठी, समाजासाठी आणि अर्थात देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
आलिया भट्टचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आलिया खूप छान रट्टा मारतेस. दुसरा नेटकरी म्हणतो की, चांगली रिहर्सल केली आहेस. मात्र, आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. काही जण म्हणतात की, बोलताना मोठ-मोठे शब्द वापरले म्हणजे तुम्ही समजूतदार होत नाही. आलिया, तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. आलिया भट्ट इंटरनेटवर ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आलियाने परिधान केलेल्या एका टी-शर्टमुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आलिया भट्ट लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये आलियाबरोबर रणवीर सिंह हा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.