‘द केरला स्टोरी’नंतर ‘अजमेर-९२’ वादाच्या भोवऱ्यात
‘द केरला स्टोरी’पाठोपाठ आता आणखी एक आगामी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुढील महिन्यात प्रदर्शित होणारा ‘अजमेर-९२’ हा नवा हिंदी चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट अल्पसंख्याक समुदायाबद्दल भाष्य करणारा आणि ३० वर्षांपूर्वी अजमेरमध्ये किशोरवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारावर बेतलेला आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या इस्लामी संघटनेने चित्रपटाच्या विरोधात मोर्चा काढला असून यावर बंदी घालायची मागणी करण्यात आली आहे.
या संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले की, ‘अजमेर शरीफ दर्ग्याची बदनामी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या या चित्रपटावर तत्काळ बंदी घातली पाहिजे. गुन्हेगारी घटनांना धर्माशी जोडण्याऐवजी त्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे. हा चित्रपट समाजात तेढ निर्माण करेल.’ मौलाना मदनी यांच्या म्हणण्यानुसार अजमेर शहरात ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढत आहे ते अत्यंत घातक ठरू शकते. शिवाय हे संपूर्ण समाजासाठी घृणास्पद कृत्य आहे.
ते पुढे म्हणाले की, 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे लोकशाहीचे वरदान आहे, पण याच्याआडून देश तोडणाऱ्या विचारांचा प्रचार करणे योग्य नाही. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण होते, तसेच लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारे होते, असे मौलाना महमूद मदनी यांनी वर्णन केले आहे. त्यांनी चिश्ती यांचे देशातील शांतता आणि सौहार्दाचे दूत म्हणूनही वर्णन केले आहे.'
पुष्पेंद्र सिंग दिग्दर्शित या चित्रपटात जरीना वहाब, सयाजी शिंदे, मनोज जोशी आणि राजेश शर्मासारखे कसलेले कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘अजमेर ९२’ या चित्रपटात १०० हून अधिक तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची कथा दाखवली जाणार आहे. बहुतेक पीडित मुली या शाळेत जाणाऱ्या होत्या आणि त्यांच्यापैकी कित्येकींनी नंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही म्हटले जाते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.