झिरो राऊंड आजपासून सुरू; अकरावीसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात ; पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांची घोषणा
दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी मध्ये प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरूवात झाली आहे. (FYJCAdmission)झिरो राऊंड आजपासून (मंगळवार 18 जून) सुरू झाल्याची अधिकृत घोषणा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी केली आहे. (11th admission)
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. परिपूर्ण अर्ज भरून पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कला शाखेसाठी 5525 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. तर वाणिज्य शाखेसाठी 24658, विज्ञान शाखेसाठी 39492 तसेच व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी 692 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे.
जाहीर केलेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, गुणांमध्ये दुरूस्ती असल्यास तसेच त्यांच्या हरकती विद्यार्थी लॉगीनमध्ये तक्रार निवारण टॅबमध्ये करू शकणार आहेत. शिक्षण उपसंचालक पुणे कार्यालयाकडून हरकती व तक्रारींचे निवारण केले जाईल, असे आश्वासन विभागीय उपसंचालक अहिरे यांनी दिले आहे.
निर्धारीत वेळापत्रकानुसार 18 जून ते 21 जून पर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील इनहाऊस, मॅनेजमेंट आणि मायनॉरिटी कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. परंतु या सर्व कोटा अंतर्गत प्रवेश घेतला असल्यास विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत (CAP)मध्ये सहभागी होता येणार नाही.