संग्रहित छायाचित्र
देशातील सर्वात सक्षम आयोग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ओळखला जातो. उमेदवारांना नियोजनबद्ध पूर्वतयारी, अभ्यास करता यावा यासाठी दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. परंतु मराठा आरक्षण, विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता, देशपातळीवरील विविध परीक्षांच्या तारखांमुळे वेळापत्रकात बदल, विद्यार्थी आंदोलनामुळे पुढे ढकललेल्या परीक्षा यामुळे हजारो उमेदवारांची वयोमर्यादा संपली तसेच पूर्वनियोजित वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. आजघडीला एमपीएससीच्या तब्बल ११ परीक्षा प्रलंबित असून त्यासाठी तयारी करणारे लाखो उमेदवार प्रतीक्षेत आहेत.
इच्छुक विद्यार्थी सचिन सोनवणे म्हणाले, ‘‘परीक्षार्थींना परीक्षांची तयारी योग्यरितीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी होणार, याचा अंदाज यावा म्हणून एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. २०२४ च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता. यापैकी अद्याप ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५ च्या संभाव्य वेळापत्रकावरून दिसून येते. विशेष म्हणजे काही परीक्षा झाल्या तर काहींचे निकाल नाही, तर काहींचे अभ्यासक्रमही जाहीर व्हायला विलंब होत आहे.’’
स्पर्धा परीक्षा असोसिएशनअध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, ‘‘एमपीएससीकडून दोन दिवसांपूर्वी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यात पुढील वर्षाचे नियोजन आणि २०२४ मधील प्रलंबित परीक्षांची माहिती आणि त्यांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावरून २०२४ मध्ये जाहीर झालेल्या ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांपासून एमपीएससीकडून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नाही . परिणामी २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीतच आहे. अनेक पूर्वपरीक्षा आणि इतर परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे उमेदवारांचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी २०२५ मध्ये येणार असून परीक्षा सप्टेंबर २०२५ मध्ये होण्याची शक्यता आयोगाने वर्तवली आहे. मात्र, २०२४ च्या परीक्षाच पूर्ण न झाल्याने २०२५ च्या परीक्षा कशा होणार, असा प्रश्न संतप्त उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.’’
राज्यसेवेच्या विविध पदांसाठी १ डिसेंबर रोजी दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परीक्षा चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २ डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेची क्लार्क भरती परीक्षा आहे. त्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत विविध पदांसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धावपळ होणार आहे. बहुतांश उमेदवारांना दोन्ही पैकी एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र आहे.
प्रलंबित परीक्षा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२३ : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा : मागणीपत्र नाही
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा : मागणीपत्र नाही
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ : पूर्व परीक्षा प्रलंबित
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ : पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ : मुख्य परीक्षा २१ जून २०२५
न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ : जाहिरात प्रलंबित
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२४ : पूर्व परीक्षा १ डिसेंबर
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ : मुख्य परीक्षा १० मे
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ : मुख्य परीक्षा १८ मे २०२५
कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ : मुख्य परीक्षा १८ मे २०२५