अजित पवारांनी काढला लोकसभेचा वचपा; विधानसभा निवडणुकीत केला हर्षवर्धन पाटील, संजय जगताप, संग्राम थोपटे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’, जिल्ह्यावर घेतली पकड

लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या ‘होम ग्राऊंड’वर पत्नीच्या झालेल्या पराभवाचा वचपा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत काढला.

Ajit Pawar

अजित पवारांनी काढला लोकसभेचा वचपा; विधानसभा निवडणुकीत केला हर्षवर्धन पाटील, संजय जगताप, संग्राम थोपटे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’, जिल्ह्यावर घेतली पकड

लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या ‘होम ग्राऊंड’वर पत्नीच्या झालेल्या पराभवाचा वचपा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत काढला. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील ज्या आमदार आणि नेत्यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांना घरी बसवण्यात अजित पवार यशस्वी ठरले.

भोरचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर, सुनेत्रा पवारांविरुद्ध काम केल्याची जाहीर कबुली दिलेल्या हर्षवर्धन पाटील यांनाही अजित पवारांनी अस्मान दाखवले. त्याचबरोबर दौंडच्या रमेश थोरात यांनादेखील चितपट केले. महायुतीच्या ताकदीचा फायदा उचलत अजित पवार यांनी बारामतीचा गड सहजपणे राखला.

यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वपूर्ण ठरल्या. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी या दोन्ही निवडणुका भवितव्य ठरवणाऱ्या होत्या. लोकसभेला या दोन्ही नेत्यांना झटका बसला होता. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार होत्या. त्यांच्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांचे आव्हान होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दुभंगल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. ही निवडणूक वरकरणी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी दिसत असली तरी ती प्रत्यक्षात अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच लढत होती. या निवडणुकीत महायुतीने एकत्रित येत सुनेत्रा पवारांसाठी ताकद पणाला लावली होती. दोन्ही नेत्यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केलेली होती. शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन दिलजमाई केली होती, तर महायुतीने हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर केली होती. तसेच, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे मनोमिलन घडवून आणले होते.

तरीदेखील लोकसभेला सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. खुद्द बारामतीमध्ये ४८ हजारांपेक्षा कमी मते त्यांना पडली होती. दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर मतदारसंघातून देखील सुळे यांना मताधिक्य मिळाले होते. केवळ खडकवासला येथून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळालं होतं. सुप्रिया सुळे यांना एकूण ७,३१,४०० तर सुनेत्रा पवार यांना एकूण ५,७३,३९१ मते मिळाली होती. सुळे यांनी १ लाख ५८ हजार ९ मतांनी विजय मिळवला होता. हा पराभव अजित पवार यांच्यादेखील जिव्हारी लागला होता. मात्र, त्यांनी पराभवाचे आत्मपरीक्षण केले. लोकसभेला अपयश का आले, याचा शोध घेतला. तसेच, सुनेत्रा पवारांना सुळे यांच्या विरोधात उभे करण्याचा आपला निर्णय चुकला, हे जाहीरपणे मान्य केले. त्याचा सकारात्मक परिणाम मतदारांमध्ये पाहायला मिळाला.

दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणुका जाहीर केल्या. महायुतीच्या जागा वाटाघाटीत बारामती, भोर, इंदापूर हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेले, तर दौंड आणि खडकवासला भाजपाकडे राहिले. पुरंदरची जागा शिवसेनेकडे गेली. या सहाही मतदारसंघांमध्ये युतीधर्म पाळला जाणार की एकमेकांचे पाय खेचले जाणार, याकडे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील शरद पवार यांचा राजकीय प्रभाव पाहता ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण बनली होती. दोन्ही पवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय या निवडणुकीत होणार होता. अजित पवार यांनी जसे राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न केले; तसेच महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठीदेखील प्रयत्न केले. त्याचाच परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाला. ‘‘जर मी ठरवले ना एखाद्याला आमदार नाही करायचा तर, मी कोणाच्या बापाला ऐकत नसतो’’ हे वाक्य अजित पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.

भोर-वेल्हा

शरद पवारांचे परंपरागत प्रतिस्पर्धी मानले गेलेल्या अनंतराव थोपटे यांची भोर-वेल्हा मतदारसंघावर पकड आहे. मागील १५ वर्षांपासून संग्राम थोपटे या ठिकाणी आमदार आहेत. त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शरद मांडेकर यांनी पराभव केला. मांडेकर यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमधील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्यांच्याकडे पुणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी होती. त्यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली. मात्र, थोपटे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी मांडेकर यांना पूर्ण ताकद दिली. थोपटे यांचा पराभव करण्यासाठी नेमके नियोजन केले. मांडेकरांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला.

बारामती

बारामती विधानसभेच्या प्रचाराची सांगता दोन्ही पवारांच्या ‘होम ग्राऊंड’वरील सभेने झाली होती. शरद पवार यांच्या सभेच्या केंद्रस्थानी सुप्रिया सुळे याच राहिल्या. दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या भाषणातून टीका टाळण्यावर भर दिला. बारामतीमध्ये तरुणांना सोबत घेण्यात त्यांना यश आले. लोकसभेमधील उमेदवारीसंदर्भातील चूक झाल्याची जाहीर कबुली देणे लोकांच्या पसंतीस उतरले. लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हा बारामतीच्या लोकांनी दिलेला शब्ददेखील पाळल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी स्वत:च्या पुतण्याविरोधात त्यांचा पुतण्या उभा करून राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला. युगेंद्र पवार अंदाजे २० ते २५ हजार मतांनी निवडून येतील, असा अंदाज बांधला जात असतानाच अजित पवारांनी मात्र कसलेल्या पैलवानाचा ‘डाव’ कसा असतो ते आपल्या ‘वस्तादा’ला दाखवून दिले.

दौंड

दौंडमध्ये भाजपाचे राहुल कुल हे आमदार आहेत. ते यंदा दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी २०१९ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर दौंडमधील अजित पवार यांचे समर्थक राहिलेले आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात हे शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लोकसभेला काम केले. विधानसभेला थोरात यांच्या विरोधात अजित पवार यांनी दौंडमधील राष्ट्रवादीची यंत्रणा सक्रिय केली. राहुल कुल यांच्या मदतीसाठी ते झटले. त्याचादेखील फायदा महायुतीला झाला. थोरात यांना पराजित करून याठिकाणी लोकसभेच्या पराजयाचा बदला घेण्यात आला.

पुरंदर

पुरंदरमध्ये माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा संघर्ष झाला. शिवतारे यांना अजित पवार यांनी ‘तू कसा निवडून येतो, तेच बघतो,’ असे जाहीर वक्तव्य केल्याने वाद वाढला होता. शिवतारे यांचा पराजय झाला होता. या ठिकाणी कॉंग्रेसचे संजय जगताप जिंकले होते. शिवतारे यांच्या मनात ही सल होती. अजित पवार महायुतीत आल्यानंतर शिवतारे नाराज झाले होते. यंदाच्या लोकसभेला त्यांनी जाहीरपणे त्यांच्याविरोधात वक्तव्य केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील वाद मिटवण्यात यश आले. शिवतारे यांनीदेखील लोकसभेला सुनेत्रा पवार यांना मदत केली. अजित पवार यांनीदेखील विधानसभेला शिवतारे यांना साथ देत विजयात वाटा उचलला. आणि संजय जगताप यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाला.

इंदापूर

इंदापूरमध्ये मूळचे कॉंग्रेसचे परंतु काही वर्षांपूर्वी भाजपत गेलेल्या हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार असा जुना संघर्ष आहे. अजित पवार महायुतीत आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची घुसमट सुरू झाली होती. लोकसभेला सुनेत्रा पवार यांना मदत करण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनोमिलन घडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. विधानसभेला विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. त्यामुळे पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीत प्रवेश केला. प्रवेश करताना झालेल्या सभेत त्यांनी सुळे यांचे छुप्या पद्धतीने काम केल्याची कबुली दिली. अजित पवार यांनी इंदापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांचे इंदापूरचे भाषणदेखील चर्चेत राहिले. भरणे यांनीदेखील पाटील यांना अस्मान दाखवत इंदापूरची जागा राखली.

खडकवासला

भाजपचे भीमराव तापकीर हे सलग तीन वेळा आमदार होते. यंदा ते चौथ्यांदा निवडून आले. शहरी आणि ग्रामीण असा भाग असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचादेखील मतदार आहे. तापकीर यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यंदाही पराजयाचा सामना करावा लागला. तापकीर यांच्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी युतीधर्म पाळत उभी राहिली. मागील निवडणुकीत तापकीर यांचे घटलेले मताधिक्य यंदा वाढले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest