संग्रहित छायाचित्र
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपने १३२ जागा जिंकल्या आहेत आणि महायुतीला २३४ जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. या पराभवाचे खापर आता संजय राऊत यांनी धनंजय चंद्रचूड यांच्यावर फोडले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीची लढाई बरोबरीत सुरु होती. पण नंतर पुढच्या दोन तासांत सगळे चित्र बदलले. निकाल आधीच ठरला होता फक्त मतदान करुन घेतले, मतदान होऊ दिले. तसेच जे काही घडले त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
धनंजय चंद्रचूड हे उत्तम प्रोफेसर किंवा बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता तर महाराष्ट्रातील चित्र बदलले असते. आज जे चित्र दिसत आहे ते नक्कीच दिसले नसते. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत. आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली. जी काही दुर्घटना महाराष्ट्रात झाली त्याला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे गुजरात लॉबी ठरवेल
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्राऐवजी गुजरातला शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. शिवतीर्थावर शपथविधी सोहळा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. तसंच वानखेडे स्टेडियमवर शपथविधी झाला तर तो महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल. हे सरकार गुजरात लॉबीला हवे होते. त्यामुळे आणण्यात आले आहे आणि लादण्यात आले आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
जनतेच्या न्यायालयात न्याय विकत घेण्यात आला
जनतेच्या न्यायालयातही न्याय विकत घेण्यात आला. पैसा प्रचंड वापरण्यात आला. आम्ही निराश नाही पण आम्हाला वाईट जरुर वाटले. महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता आम्हाला आहे. मतविभागणी हा सर्वात मोठा फॅक्टर ठरला. मतविभागणीचे जे अडथळे निर्माण केले त्याकडे त्यांनी लक्ष दिले. मनसे, वंचित यांना मॅनेज करुन ठिकठिकाणी कमी कमी मतांनी पाडण्यात आले ते चित्र मुंबईसह सगळीकडे पाहता येईल. अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी काय तीर मारला आहे? संघाची भूमिका ही या निवडणुकीत महत्त्वाची राहिली आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी विषारी प्रचार केला, त्याचा आम्हाला फटका बसला. शरद पवारांसारखा मोठा नेता आहे महाराष्ट्रातला त्यांनी या राज्यांत गद्दारांविरोधात भूमिका घेतली. त्यांना प्रतिसाद मिळत होता. त्यांना मानणारा वर्ग आहे तिथे त्यांचे उमेदवार पडले असतील तर तो गंभीर विषय आहे. एकनाथ शिंदे हे काही मोठा विचार घेऊन राजकारणात आलेले नाही. त्यांनी शिवसेनेशी बेईमानी करुन मोदी शाह यांच्या मदतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला असंही संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपची वृत्ती वापरा आणि फेका अशी आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबती जे घडलं ते एकनाथ शिंदेंबाबत घडेल का? अशी शंका मला वाटते आहे असंही संजय राऊत म्हणाले.