संग्रहित छायाचित्र
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. दूध उत्पादक संघांनी प्रतिलिटर ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघटनेच्या दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवार (२१ ऑक्टोबर) रोजी कोल्हापूरमध्ये पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
गोकुळ, 'वारणा' व 'राजारामबापू' या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.चे दूध ३० रुपये लिटरने खरेदी केले जाणार आहे. २१ नोव्हेंबरपासून या दराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय खासगी व सहकारी दूध संघ संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी किमान प्रतिलिटर दर २८ रुपये आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गायीचे दूध खरेदी करत आहेत. परंतु, फक्त कोल्हापूर जिल्ह्यात ३३ रुपये दराने दूध खरेदी केले जाते. हा फरक ६ रुपये जास्त आहे. त्यामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किमत जास्त येते असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. त्याचबरोबर सध्या गाय व म्हशीचे दूध उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
३० रुपये दराने खरेदी करणार दूध
सध्याच्या परिस्थितीत गायीच्या दुधाची उपलब्धता चांगली असेल परंतु दूध भुकटी व लोण्याच्या विक्री किमतीत कोणतीही वाढ दिसून येत नाही. अशा परिस्थितीत दूध खरेदी दर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दूध उत्पादक संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गाय दूध खरेदी दरामध्ये कपात करण्यात आली असून गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता ३३.०० ऐवजी ३० रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.