संग्रहित छायाचित्र
वर्धा : विधानसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत एकट्या भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा मिळवल्या. उमेदवारी देतांना अनेक नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली. यातील एक नवे नाव म्हणजे सुमित वानखडे. सुमित वानखडे हे देवेंद्र फडणवीस यांचे पीए (स्वीय सहायक) होते. त्यांना वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. ते वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवून निवडणूक आलेले उमेदवार आहेत.
नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे हे आर्वी पालिकेच्या ऐतिहासिक गांधी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. बरीच वर्षे आर्वीबाहेर राहूनही वानखेडे यांना उमेदवारी देणात आली. यात देवेंद्र फडणवीस यांचा पाठीशी असलेला भक्कम हात कारणीभूत ठरला. विद्यमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारत सुमित वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना दिलेल्या संधीचे वानखडे यांनी सोने केले. सुमीत वानखेडे यांच्यासाठी विधानभवन तसे पाहिले तर नवे नाही. कारण ते गेली अनेक वर्षे विधानभवनात फिरत आहेत. या पूर्वी आमदार, मंत्र्यांचे पीए म्हणून ते विधानसभेत गेले आहे. मात्र, आता ते थेट आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव झळकले होते. वानखेडे यांच्याकडे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपद देखील सोपवले होते. नेत्यांचे स्वीय सचिव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिली वेळ नाही.
सुमित वानखडे हे पुण्यातील एका खासगी महाविद्यालयातून गव्हर्नन्सची पदव्युत्तर पदवी घेतली. वानखेडे हे फडणवीस यांचे गेल्या काही वर्षांपासून स्वीय सहायक राहिले आहेत. प्रशासकीय कामाव्यतिरिक्त त्यांनी शेतीकडेही लक्ष दिले आहे. आर्वीतील ते एक प्रगतिशील शेतकरी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) मयुरा अमर काळे यांचा सुमारे ३९ हजार मतांनी पराभव केला. आमच्यासारख्या प्रशासकीय लोकांसाठी आणि नोकरशाहीत काम करणाऱ्यांना हा दुहेरी फायदा आहे. आम्हाला आधीच प्रशासनात काम करण्याचा अनुभव असल्याने, याच अनुभवाचा फायदा आमदार म्हणून दैनंदिन काम हाताळण्यास फायदेशीर ठरतो, असे सुमित वानखेडे यांचे म्हणणे आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले अभिमन्यू पवार हे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून आमदार बनलेले आहेत. यंदा ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी औसा मतदारसंघातून काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा २६ हजार मतांनी पराभव केला. २०२४ च्या निवडणुकीत पवार यांनी शिवसेनेच्या (उबाठा) दिनकर माने यांचा ३३ हजार हजार मतांनी पराभव केला आहे.