पुणे-मुंबई एक्स्प्रेस गाड्यांचे डबे वाढवणार का?

कोरोना काळामध्ये रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. याचा सर्वाधिक फटका पुणे-मुंबई लोहमार्गाला बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील प्रवासीसंख्या लक्षात घेता सोयीस्कर प्रवासासाठी कोणत्याही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्र. १० व ११ ची लांबी वाढवण्यात येत असून, त्यामुळे या फलाटांवर २३ डब्यांची रेल्वे थांबू शकणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 27 May 2024
  • 04:48 pm
Maharastra News train

संग्रहित छायाचित्र

सीएसटी स्थानक फलाट विस्तारीकरणामुळे पुण्याला फायदा, डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय

कोरोना काळामध्ये रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. याचा सर्वाधिक फटका पुणे-मुंबई लोहमार्गाला बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील प्रवासीसंख्या लक्षात घेता सोयीस्कर प्रवासासाठी कोणत्याही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्र. १० व ११ ची लांबी वाढवण्यात येत असून, त्यामुळे या फलाटांवर २३ डब्यांची रेल्वे थांबू शकणार आहे. याचा फायदा पुणेकरांना होणार असून, या मार्गादरम्यान धावणाऱ्या  एक्स्प्रेसचे डबे वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रवासी वर्ग अपेक्षा व्यक्त करत आहे.

पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड व प्रगती  एक्स्प्रेस  या  एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवासी वर्ग करीत आहे. मात्र, फलाटांचे लांबीकरण झाल्यानंतर डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट केले होते. आता फलाटांची लांबी वाढणार असल्यामुळे डब्यांची संख्या वाढवून घ्यावी, यासाठी पुन्हा मागणीचा जोर वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली पुणे-मुंबई रेल्वे सेवा, प्रवासी संघटनेच्या आग्रही मागणीनुसार २२ मार्च २०२२ पासून नव्या स्वरूपात एलएचबीसह सुरू केल्या आहेत. मात्र, डेक्कन क्वीन व सिंहगड या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय होत असल्याने पुणे-मुंबई प्रवासादरम्यान अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते.  दुसरीकडे, डेक्कन क्वीन  एक्स्प्रेसला एकच जनरल डबा असल्यामुळे, या डब्यामध्ये उभे राहणे देखील मुश्कील होते. जागा न मिळालेले तिकीटधारक साहजिकच आरक्षित किंवा मासिक पासधारक डब्यांमध्ये घुसतात व मासिक पासधारकांशी वाद होत असल्याने त्याचे पर्यावसन भांडणात असल्याने त्याचा त्रास इतर प्रवाशांना होतो.

वास्तविक, सिंहगड एक्स्प्रेस मार्च, २०२० पर्यंत १९ डब्यांची, तर २१ मार्च २०२२ पर्यंत १६ डब्यांची होती. सध्याची नवीन गाडी १४ डब्यांची असून २ जनरल डबे कमी करण्यात आले आहेत. तसेच डेक्कन क्वीन  एक्स्प्रेसचे १ जनरल व २ एसएलआर डबे कमी करण्यात आले आहेत. पुणे-मुंबई मार्गावरील सर्व इंटरसिटी गाड्यांमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी अर्धा डबा आरक्षित आहे, मात्र सिंहगड  एक्स्प्रेसमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र डबा नाही, किमान अर्धा डबा मासिक पासधारक महिलांसाठी राखीव असणे गरजेचे आहे. पुणे-मुंबई प्रवास करणारे दररोजची संख्या लाखोंच्या घरात आहे. पूर्वीपासून या प्रवाशांना सोईस्कर आणि विनाअडथळा प्रवास व्हावा, अशी मागणी आहे. मात्र, या दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे-लोणावळा लोकलची तीच परिस्थिती असल्याने अनेकदा पत्रव्यवहार आणि चर्चा करून देखील अपेक्षित बदल होत नसल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

सिंहगड एक्स्प्रेस व डेक्कन क्वीन या दोन्ही गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे, अनारक्षित तसेच आरक्षित तिकीटधारक व मासिक पासधारकांना प्रवास त्रासदायक होत आहे. या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे जनरल डबे जोडण्याची आम्ही मागणी केली आहे.

-इक्बाल मुलाणी, सदस्य, केंद्रीय रेल्वे पुणे विभाग सल्लागार समिती

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest