क्लीनचीट कशी दिली हे वकील म्हणून फडणवीस सांगतील का?
#मुंबई
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट यांनी अश्लील वक्तव्य प्रकरणात पोलिसांनी क्लीनचिट दिल्याचं वक्तव्य केले आहे. यावर ही क्लीनचिट कशी दिली हे वकील या नात्याने फडणवीसांनी जरा सांगावे, असे अंधारे यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “छत्रपती संभाजीनगरच्या एका आमदाराने असभ्य आणि सवंग भाषेचा वापर केला. ती भाषा स्त्री मनाला लज्जा आणणारी होती. त्या भाषेचे अनेक व्हिडीओ सार्वजनिक आहेत. एकीकडे शितल म्हात्रे प्रकरणात ओरिजनल व्हिडीओ दाखवता येत नाही तरीही गुन्हे दाखल होतात. दुसरीकडे आम्ही ओरिजनल व्हिडीओ दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत. याबाबत आम्ही महिला आयोगाकडे धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी दाद घेतली नसल्याने आम्ही कलम १५६ नुसार न्यायालयाकडे दाद मागितली.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्या खात्याकडूनच चौकशी समिती नेमली गेली. त्यामुळे त्यांना त्याविषयी जास्त माहिती असेल. शिरसाट यांना ही क्लीनचिट कशी दिली ते मला कळेल का? वकील म्हणून देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतील का?”
असे सुषमा अंधारे म्हणाल्या की, एखाद्या प्रकरणात एसआयटी नेमली असेल, तर पोलीस अधिकारी एकांगी चौकशी करतात का? या प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार दोघांचंही म्हणणे ऐकावं लागेल. कोणत्या अधिकाऱ्याला नेमले, नेमलेला अधिकारी महिला होती की पुरुष हेच मला माहिती नाही. त्या अधिकाऱ्यांचा प्रशासकीय वर्ग काय होता हेही मला माहिती नाही. ते माहिती करून घेण्याचा अधिकार मला आहे की नाही हे मला वकील फडणवीसांना सांगावे गृहमंत्री फडणवीस सत्तेच्या बाजूने बोलतील. वकील या नात्याने फडणवीस कदाचित तथ्य समोर ठेवतील. त्यामुळे वकील फडणवीसांनी मला जरा माहिती सांगावी.