संग्रहित छायाचित्र
ही माझी शेवटची विधानसभा निवडणूक होती. आता पक्ष नवीन नेतृत्व देणार असून त्याच्यामागे ठामपणे उभे राहणार असल्याची भावना रविवारी माजी आमदार आडम उर्फ आडममास्तरांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात ज्येष्ठ उमेदवार (वय ८० वर्षे) म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. शहर मध्य मतदारसंघात त्यांचा चौथ्यांदा पराभव झाला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करताना आडम म्हणाले की, जाती-धर्म आणि धनावर ही निवडणूक झाली. बनावट पत्र तयार करून सोशल मीडियावर मतदारांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे माझा पराभव झाला. कामगारांसाठी चाळीस हजार घरे बांधून दिल्यानंतरही मते मिळत नाहीत हे कसे घडले? या प्रश्नावर ते म्हणाले की, १९ जानेवारी २०२४ रोजी रे नगरातील घराच्या चाव्या देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. वास्तविक हा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचे ठरले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेय लाटण्यासाठी मोदी आले आणि भाजपनेच या प्रकल्पासाठी मदत केल्याचा देखावा केला. लोकांचाही असाच ग्रह झाला.
सामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करून, त्यांना न्याय कसा मिळेल याच ध्यासाने समाजकारण-राजकारणात अनेक जण काम करतात. त्यात फायदा-तोट्याचा विचार नसतो. अशांपैकीच एक सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून विधानसभेवर तीनदा निवडून गेलेल्या आडम मास्तरांना नुकतेच ‘कामगारमहर्षी गं. द. आंबेकर जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. पुढे मग कुटुंबाला हातभार लागाला यासाठी ते एखाद्या दुकानाचे हिशेब लिहू लागले, मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. त्यातून ते ‘आडम मास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
खडा आवाज, उत्तम संघटनकौशल्य व प्रश्न समजून घेण्याची हातोटी यामुळे सूतगिरणी असो वा यंत्रमाग किंवा विडी कामगार त्यांना आडम यांनी लालबावटय़ाखाली संघटित केले. त्यातून नेतृत्व पुढे आले. पुढे १९७४ मध्ये कामगार वस्तीतून सोलापूर महापालिकेवर ते विजयी झाले. पुढे १९७८ मध्ये ते विधानसभेवर गेले. त्यानंतर १९९५ व २००४ असे तीन वेळा ते आमदार झाले. असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. या कामाची पावती म्हणून आदर्श लोकप्रतिनिधीचा बहुमान त्यांना मिळाला. एकीकडे संघर्षांतून मागण्या मान्य करून घेताना रचनात्मक कामातून सोलापूरमध्ये दहा हजार महिला विडी कामगारांसाठी कॉ. गोदाताई परुळेकर घरकुलाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला.