सोलापूर : धर्मराज काडादी, मिस्त्रींसह ५९ उमेदवारांची अनामत जप्त

दक्षिण सोलापूर मतदारसंघ, मध्य सोलापूर मतदारसंघ आणि उत्तर सोलापूर मतदारसंघ या तीन मतदारसंघात एकूण ६५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यापैकी ५९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आलीली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 25 Nov 2024
  • 04:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिग्गज उमेदवारांना बसला पराभवाचा झटका; एक शष्टांश मतेही नाही आली मिळवता

दक्षिण सोलापूर मतदारसंघ, मध्य सोलापूर मतदारसंघ आणि उत्तर सोलापूर मतदारसंघ या तीन मतदारसंघात एकूण ६५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. त्यापैकी ५९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवता आलीली नाही. त्यात मध्य मतदारसंघातून माजी आमदार नरसय्या आडम, दक्षिणमधून धर्मराज काडादी, बाबा मिस्त्री, संतोष पवार, महादेव कोगनुरे यांचा उत्तर मतदारसंघातून माजी महापौर शोभा बनशेट्टी आदींचा समावेश आहे.

२०१९ च्या निवडणुकीत तीनही मतदारसंघात ५० उमेदवार होते. त्यापैकी ४३ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी राखीव जागेसाठी पाच हजार रुपये तर खुल्या जागेसाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत होती. अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण झालेल्या मतदानापैकी एक शष्टांश मते मिळवणे आवश्यक आहे. सोलापूर मध्य मतदारसंघात दोन लाख २९१ मतदान झाले. येथे किमान ३३ हजार ३८१ मते घेणे गरजेचे होते. भाजपच्या देवेंद्र कोठे व एमआयएमचे फारूक शाब्दिक यांना जास्त मते मिळाली. उर्वरित १८ जणांची अनामत रक्कम जप्त झाली. २०१९ मध्ये येथे १६  जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

सोलापूर दक्षिण मतदारसंघात २५ उमेदवार होते. दोन लाख २३ हजार ६२४ मतदान झाले. अनामत वाचवण्यासाठी ३७ हजार ५३५ मते अपेक्षित होती. शिवसेनेचे अमर पाटील वगळता कोणालाही ३० हजारांपेक्षा जास्त मते मिळाले नाहीत. २०१९ मध्ये १२ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. यंदा शहर उत्तर मतदारसंघात १ लाख ९१ हजार ३९४ मतदान झाले. येथे ३१ हजार ८९९ मते घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे सोडून १८ जणांची अनामत जप्त झाली. इथे २०१९ मध्ये १५ जणांची अनामत जप्त झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest