आमचे रिपोर्ट कार्ड कशाच्या आधारावर तयार केले?
#मुंबई
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातील शिंदे गट-भाजप सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी दिली असली तरी हा विस्तार शांततेने होणार नसल्याचे दिसत आहे. अकार्यक्षमतेचा निकष लावून शहा यांनी शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची सूचना केली असतानाच या पाचही मंत्र्यांनी ‘आमचे रिपोर्ट कार्ड कशाच्या आधारावर तयार केले,’’ असा सवाल भाजपला केला आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गट आणि भाजपच्या काही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीत जाऊन आले. यानंतर शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांना बदलण्याची सूचना देण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले होते. महाराष्ट्रातून मिळालेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र अब्दुल सत्तार, संजय राठोड, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत या पाचही मंत्र्यांनी हे आक्षेप फेटाळले आहेत.
हा गोपनीय अहवाल फुटल्यानंतर भाजप बॅकफूटवर आला आहे. दुसरीकडे, शिंदे गटात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. हा अहवाल कशाच्या आधारे केला, असा त्यांचा प्रश्न आहे. शिंदे गट शिवसेनेचे प्रवक्ते असलेले शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्याचे नियोजन सध्या चालू आहे, पण नेमकी तारीख सांगता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र ते कोण नवे चेहरे असतील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील.
‘‘माझ्यावर करण्यात आलेले अकार्यक्षमतेचे आरोप खोटे आहेत. कोविड काळात आम्ही शेवटच्या माणसापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवल्या. कोणत्याही व्यवहारासाठी कुणाची नेमणूक केली नाही. जे खासगी सचिव, ओएसडी नेमले ते आरोग्य विभागाचे कामकाज चांगले व्हावे म्हणूनच नेमले. आरोग्य खात्यातील सुधारणांचा आलेख
वाढवण्याचे काम आम्ही केले,’’ असा खुलासा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीआपल्यावरील आरोपांबाबत केला.
आमच्यात वाद नाही, अहवाल तयार केला नाही : बावनकुळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘शिंदे गटाचे पाच मंत्री अकार्यक्षम ठरवल्याचा कोणताही अहवाल भाजपने दिलेला नाही. विस्तार रखडल्याने ना मुख्यमंत्री नाराज आहेत ना युतीत वाद आहेत. काही नेते १५-१५ दिवस लंडनला विश्रांतीसाठी जातात. मग १८ तास काम करणारे मुख्यमंत्री आपल्या परिवाराला तीन दिवस देऊ शकत नाही का? आमच्यात कुठलाही वाद नाही.’
आता खरे स्फोट होतील : संजय राऊत
ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्यातील पाच मंत्र्यांचे राजीनामे भाजप श्रेष्ठींनी मागितले असल्याचे वृत्त खरे असल्याचा दावा केला. यात चार जण शिंदे गटाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता खरे स्फोट व्हायला सुरुवात होईल, असेही ते म्हणाले.
वृत्तसंस्था