संग्रहित छायाचित्र
बदलापुर पूर्व येथील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तब्बल १२ तासांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप पोलिसांनी केला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली. दरम्यान, शाळेकडून या प्रकरणी माफी देखील मागण्यात आली.
त्यानंतर आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. यात पालकांसह इतर नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व पालक विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले होते. तेथे त्यांनी आंदोलन केलं. चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला फासावर लटकवा अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर संतप्त पालक आंदोलकांचा जमाव दहा वाजण्याच्या सुमारास विद्यालयाकडून थेट बदलापूर रेल्वे स्थानकावर गेला आणि त्यांनी उस्फूर्त रेल रोको आंदोलन केलं. पालकांचा संताप अनावर झाल्याचं यावेळी बघायला मिळालं आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून शाळेत प्रवेश केला आणि तोडफोड केली. तर जमावाला हटवण्यासाठी शाळेच्या बाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्याची माहिती मिळत आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. बदलापूर रेल्वे ट्रॅकवरून आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला गेला होता.
दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आरोपीला अटक झाली आहे. त्याला कठोर शिक्षा होईल. पोक्सो अंतर्गत कलमं लावली जातील. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असे आश्वासन देवून आंदोलकांना संयमाने घेण्याची विनंती केली.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्म वर याबद्दल माहिती दिली. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.