व्हायरल व्हीडीओ सोमय्यांच्या 'अंगलट'
# मुंबई
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हीडीओवरून विधान परिषदेत मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात की, त्यात माणसाचे पूर्ण राजकीय आयुष्य आणि आजवरची पुण्याई पणाला लागते, पण समोर आलेल्या प्रकरणात काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही नक्कीच करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.”
अंबादास दानवेंचा हल्लाबोल
अंबादास दानवे विधान परिषदेत म्हणाले, “आपले राज्य फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि आहिल्याबाई होळकर यांचे आहे. असे असताना सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या सगळ्या विचाराला छेद देत असल्याची स्थिती आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाचे नाव घेत नाही. परंतु काही लोक आहेत, जे ईडी, सीबीआय आणि आयटी विभागाची भीती दाखवतात. या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेलिंग करणं आणि खंडणी गोळा करण्याचं काम केलं जातंय. या बाबतच्या काही बाबी समोर आल्या आहेत.
संबंधित व्यक्ती त्यांच्या पक्षातल्या महिला-भगिनींना पद, जबाबदारी, मंडळ, महामंडळे देतो. माझे ईडी, सीबीआय आणि आयटी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. अशी भीती दाखवून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतात. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, त्याच पक्षाचा एक मोठा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने जे काही केलं आहे, ते अतिशय धक्कादायक आहे.अनेक महिलांना राज्यसभा, विधान परिषद आणि महामंडळात नियुक्त्या देतो, असे सांगून ब्लॅकमेल केले जात आहे.
या प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षात आहे, हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. म्हणून माझ्याकडे काही व्हीडीओज आले आहेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हीडीओ माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. त्या भगिनींना मी सलाम करेन. कारण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला केंद्राची सुरक्षितता आहे. या सुरक्षिततेचा वापर महिलांकडून खंडणी करण्यासाठी केला जातोय की काय, अशी स्थिती आहे,” असे अंबादास दानवेंनी नमूद केले.
सोमय्यांच्या व्हीडीओचा पेनड्राइव्ह
'किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यांचा एक पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे. यामध्ये अतिशय किळसवाणे व्हीडीओज आहेत. अशा लोकांवर सरकार कारवाई करणार का? त्यांचे संरक्षण काढून घेणार का? की, केंद्र सरकारकडून संरक्षण वाढवले जाणार? या प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी माझी मागणी आहे. हे पेनड्राईव्ह आपण बघा, यातून राज्य सरकारला निर्देश द्या. या व्हीडीओमध्ये किरीट सोमय्या मराठी स्त्रियांविषयी ज्या पद्धतीने बोलले आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. हा पेनड्राइव्ह तुम्हाला सोपवतो. या सगळ्या विषयाचा तपास करावा, अशी विनंती करतो”, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
'व्हिडिओतील महिला कोण?'
अनिल परब सभागृहात बोलताना म्हणाले की, 'मागील काळात अनेक पेनड्राइव्ह बॉम्ब सभागृहात फुटले. काल एका वाहिनीवर भाजपच्या माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला. कुणाचीही बदनामी होता कामा नये. यामुळे एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त होते. पण काल ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता बाहेर आली पाहिजे. व्हिडीओतील महिला कोण? हे स्पष्ट झाले पाहिजे.'
संजय राऊत यांचे ट्वीट
खासदार संजय राऊत यांनी याच प्रकरणाशी संबंधित मात्र कोणाचेही नाव न घेता ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. आता नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहात राहावे... जय महाराष्ट्र!' या ट्वीटवर राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेन्शन केलं आहे.
नाना पटोले यांचे प्रसिद्धपत्रक
नाना पटोले यांनी याबाबत एक प्रसिद्धपत्रक काढले आहे. त्यात ते म्हणाले की, 'भाजपने मागील नऊ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हीडीओ एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवला आहे, तो पूर्ण बघितल्यानंतरच यावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्यांचे वस्त्रहरण करणाऱ्याचे आज वस्त्रहरण झाले आहे.'
शहाजीबापू पाटलांची प्रार्थना
कथित व्हायरल व्हीडीओप्रकरणी विरोधकांकडून टीका होत असताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी किरीट सोमय्यांसाठी थेट परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे. 'सोमय्यांचा संबंधित व्हीडीओ खोटा आणि बनावट निघावा, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो', असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हीडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सरपंचापासून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असला तरी त्या लोकप्रतिनिधीने नैतिकतेने वागणे, ही राजकारणातील जबाबदारी आहे. त्यामुळे सोमय्या यांची ही व्हीडीओ क्लिप खोटी आणि बनावट निघावी, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.”