संग्रहित छायाचित्र
नागपूर: विदर्भात (Vidarbha) झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सुमारे ३०,७९६ हेक्टरवरील पिकांना बसला आहे. चंद्रपूर (Chandrapur) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे सुरू असल्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.
कृषी आयुक्त कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहा आणि ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे प्राथमिक अहवालानुसार विदर्भात एकूण ३०,७९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती आणि पोंभुर्णी तालुक्यांत १२,९३८ हेक्टरवरील गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, हिंगणा, सावनेर, काटोल, कळमेश्वर, रामटेक, मौदा, उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यांत ८,८०८ हेक्टरवरील गहू, हरभरा कापूस, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आणि रब्बी सोयाबीनचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात देवळी, हिंगणघाट, आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांतील ४,४२३ हेक्टरवरील हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावतीतील धामणगाव रेल्वे तालुक्यात २,५७५ हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली आणि लाखनी तालुक्यांत १,९६१ हेक्टरवरील गहू, हरभरा, जवस आणि भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. गोंदियातील मोर अजुर्नी तालुक्यात ९० हेक्टरवर भाताचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे क्षेत्र वाढणार
नागपूर जिल्ह्यात सुमारे अकरा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रामुख्याने भात, गहू या रब्बी पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे, अशी माहिती नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिली.