शाकाहारी जेवण १६०; चहा १०, कॉफी १५ रुपये, कार्यकर्ते सांभाळण्यासाठी करावा लागतो खर्च
लोकसभा निवडणूक काळात निवडणूक (Lok Sabha Election 2024) आयोगाने विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी उमेदवाराला खर्चाची मर्यादा २० लाखांची वाढवून दिली आहे. आयोगाची या खर्चावर नजर राहणार असून, त्याचा तपशील निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे दर १२ ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामध्ये शाकाहारी जेवणासाठी आता ११२ ऐवजी १६० रुपये तर, सामिष थाळीसाठी २५० रुपये दर निश्चित केले आहेत. तसेच उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ७५ लाखांवरून ९५ लाख केली आहे.
निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना मतदारसंघात प्रचारासाठी फिरावे लागते. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानात उतरावी लागते. त्यांच्या नाश्ता-पाण्यापासून ते जेवणापर्यंतचा सर्व खर्च उमेदवाराला करावा लागतो. मतदारराजालाही खूष करण्यासाठी जेवणावळी घालाव्या लागतात. यासाठी निवडणूक काळात उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. कार्यकर्ते सांभाळण्यापासून प्रचार यंत्रणा राबविण्यापर्यंत उमेदवारांना हात सैल सोडावा लागतो. यात निवडणूक केवळ पैशांच्या आधारावर लढविली जाऊ नये, यासाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा निश्चित करून दिली जाते. उमेदवाराला प्रत्येक खर्च दररोज निवडणूक विभागाला विहित नमुन्यात सादर करावा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या बाबींवर किती खर्च करायचा, याचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून प्रत्येक दर निश्चित आहेत.
उमेदवाराला ९५ लाखांची मर्यादा
मागील निवडणुकीच्या वेळी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ७५ लाख रुपये होती. यंदा ती ९५ लाख केली आहे. त्यासाठी अर्ज दाखल केल्यापासून ते निकाल लागेपर्यंतचा खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
सभांचा खर्चही दाखवावा लागणार
प्रचारावेळी होणाऱ्या जाहीर सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरसाठी ५ तासांसाठी १० हजार रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय साउंड सिस्टिम लहान प्रत्येकी दोन स्पीकर, भोंगे प्रतिनग २४०० रुपये, तर मोठ्या साउंड सिस्टिमसाठी ३५०० रुपये दर निश्चित केला आहे. ट्यूबलाइट ५० रुपये, हॅलोजन ७० रुपये, फॅन लहान ७५ रुपये, कूलर १५० रुपये, डिजिटल टीव्ही व एलएडी स्क्रिन ६० रुपये, ड्रोन कॅमेरा आदींचेही दर निश्चित केले आहेत.
लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके
यंत्रणेने नोंदविलेला खर्च या दोन्हीची पडताळणी केली जाते. यात उमेदवाराने कमी खर्च दाखविल्यास त्यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाते. या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक तैनात असणार आहे. प्रचार सभांचे व्हीडीओ शूटिंग केले जाईल.