मुख्यमंत्र्यांच्या बनावट शिक्क्याचा वापर
# मुंबई
कारवाईसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने, पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयाकडे येत होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जातात आणि त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांकडे पाठविली जातात.
मुख्यमंत्री सचिवालयास नुकत्याच प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
फडणवीसांना ठार मारण्याची धमकी
यु ट्युब वाहिनीवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली संबंदित व्यक्ती, फेसबुक, ट्विटर वापरकर्त्याविरोधात सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन समाजामध्ये दंगा भडकवण्याच्या उद्देशाने अशी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आणि सार्वजनिक शांतता भंग होईल अशी विधान केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
शिवसेना पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी तक्रारदार फेसबुक पाहत असताना एका चित्रफीतीमध्ये मुलाखत देणारी व्यक्ती फडणवीस यांना ठार मारण्याचे वक्तव्य करीत होता. तसेच दोन जातींमध्ये वाद निर्माण होईल, असे वक्तव्यही केले. तसेच फडणवीस यांची बदनामी केली. ही चित्रफीत युट्युब, फेसबुक व ट्विटरवर व्हायरल झाली होती. ‘योगेश सावंत ७७९६’ या वापरकर्त्याने ती अपलोड केली होती. तसेच ट्वीटरवरही एका युजरआडीवरून अपलोड केली. त्यामुळे फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी व दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एका १९ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली होती. त्या प्रकरणीही अक्षय पनवेलकर यांनीच तक्रार केली होती. आरोपीने त्यावेळी ‘मी बंदुक द्यायला तयार आहे, पण तुझे लक्ष्य एकनाथ शिंदे व श्रीकांत हवे ’, अशा आशयाची पोस्ट केली होती.