वसतिगृहाच्या अल्पवयीन मुलींना रात्री पर्यटकांसमोर नाचवले
#नाशिक
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या एका वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना संध्याकाळी आणि रात्री पर्यटकांसमोर नाचवल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे.
आणखी धक्कादायक म्हणजे ज्या मुलींनी पर्यटकांसमोर नाचण्यास नकार दिला त्यांना दमदाटी करून छड्यांनी मारहाण केली जात असल्याचेही समोर आले आहे. मुलींनीच पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आली. मुलींनी तक्रार करताच पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. घडलेल्या प्रकारानंतर पालकांनी मुलींना वसतिगृहातून घरी आणले. या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकेविरुद्ध वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथे ही घटना घडली. पालकांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. याच शाळेतर्फे यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. शाळा सुरू होण्यापूर्वी सातवी ते नववीपर्यंतच्या मुलींना या वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. शाळा सुरू होण्यापूर्वी मुलींना पारंपरिक नृत्य आणि संगणकाचे शिक्षण दिले जाणार असल्याचे सांगत संस्थेने प्रत्येक पालकाकडून ३,५०० रुपये अनामत रक्कम घेतली.
शिक्षिका माधुरी गवळी मुलींना छडीने मारहाण करून दमदाटी आणि जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेचा संपूर्ण तपास नाशिक ग्रामीण उपअधिक्षक संदीप भामरे यांच्याकडे देण्यात आला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि महिला बालहक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती मधे यांनी दिली.
मुलींना जबरदस्तीने पर्यटकांसमोर नाचवले जात असल्याचा आरोप वसतिगृहाचे चालक तसेच तेथील शिक्षिकांनी फेटाळून लावला आहे. आरोपांबाबत एका शिक्षिकेने सांगितले की, ‘‘आम्ही मुलींना केवळ पारंपरिक नृत्य शिकवतो. त्यांना इतरांसमोर नाचण्यास सांगितलेले नाही. शिक्षिका मुलींना नृत्य शिकवत असताना कदाचित पर्यटक ते पाहात असतील, एवढेच. या संदर्भात पुढे आवश्यक ती काळजी घेऊ.’’
वृत्तसंस्था