‘मोदीभक्त देशभक्त नाहीत का?’: उद्धव ठाकरे यांचा सवाल
#हिंगोली : मुंबईतील इंडिया आघाडीच्या (India Alliance) सभेवेळी रविवारी माझ्या भाषणाची सुरुवात ‘माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो‘, अशी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मोदीभक्त माझ्यावर टीका करत आहेत. मला मोदीभक्तांना विचारायचंय, तुम्ही ’देशभक्त‘ नाही का, असा सवाल शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी केला. हिंगोलीत जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत जोडो न्याय यात्रेची रविवारी मुंबईत सांगता झाली. या कार्यक्रमाला राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आदींसह विविध पक्षांचे नेते मंचावर एकत्र दिसले. उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांच्या नेहमीच्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो अशा शब्दांत भाषणाची सुरुवात केली नाही. त्यांनी भाषणात हिंदू शब्द वापरला नाही. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले. त्याला ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, आम्हाला विरोधकांची आघाडी असे भाजपवाले म्हणतात. खरे आहे.
आम्ही विरोधक आहोत, पण त्या हुकूमशहाचे विरोधक आहोत. जेव्हा जनता एकवटते तेव्हा तेव्हा हुकूमशहांचा अंत होतो. ‘फोडा अन् झोडा नीती’ असणाऱ्या भाजपला तोडायची आम्ही शिवाजी पार्कवर शपथ घेत आहोत. शिवाजी पार्कवर घेतलेल्या शपथा खऱ्या झाल्याचा इतिहास आहे.
उद्धव ठाकरे यांनी रविवारी राहुल गांधी यांच्या आधी भाषण केले. त्यांनी माझ्या तमाम देशबांधवांनो असे म्हणत सुरुवात केली असून भाजपाचे आशिष शेलार यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणतात, आपल्याच तोऱ्यात, आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे... श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा”सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झाली... पण प्रश्न अनेक निर्माण करून गेली. काँग्रेसच्या हातात बाहुलीसारखी दिली उबाठा गटाची “मशाल” आता खंजीर, वाघ, मर्द... कोथळा... अशा फुशारक्या मारा खुशाल!