'शिवस्वराज्य यात्रे'त दुर्घटना टळली; जयंत पाटील, अमोल कोल्हे, रक्षा खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आजपासून (९ ऑगस्ट) राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या यात्रेच्या पहिल्याच दिवशी क्रेनच्या सहाय्याने शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघात झाला. त्यामुळे ट्रॉलीमधील मंडळी खाली पडू शकत होती. मात्र ते थोडक्यात बचावले. यावेळी क्रेनच्या ट्रॉलीत जयंत पाटील, अमोल कोल्हे, रक्षा खडसे, महबुब शेख होते. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही.
विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.