टायर फुटला, बसला आग लागली, होरपळून २५ जणांचा मृत्यू; बुलढाण्यातील अपघातात नेमकं काय घडलं ?

आम्ही १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलो होतो. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 1 Jul 2023
  • 10:40 am
बसला आग लागली, होरपळून २५ जणांचा मृत्यू

बसला आग लागली, होरपळून २५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची मदत जाहीर

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. या बसमध्ये ३२ प्रवासी बसले होते. त्यापैकी २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.

बस आधी लोखंडी पोलला धडकून नंतर रस्ता दुभाजकाला धडकली. बस उलटून बसचा दरवाजा गाडीखाली आल्याने कुणालाही बाहेर येता आले नाही. वाचलेले काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले अशीही माहिती मिळते आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डिझेल सांडले आहे. बसने पेट घेतल्याने मृतदेह होरपळले आहेत. त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

खिडकी तोडून आम्ही बाहेर पडलो !

नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसमध्ये आम्ही बसलो होतो. रात्री आमचे जेवण झाले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही बस उलटली. बस उलटल्यानंतर बसने पेट घेतला. आम्ही १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलो होतो. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो. बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. अशीही माहिती अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची मदत जाहीर

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

अपघतातील मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान आहे. कारण मृतदेह होरपळले आहेत. ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ड्रायव्हर वाचला आहे, त्याची चौकशी सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest