डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतील हजारो मराठा विद्यार्थी निर्वाह भत्त्यापासून वंचित!

एकीकडे राज्य सरकार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शेकडो कोटींचा निधी देत असल्याचा दावा करत आहे. मात्र, २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ५८,५०२ अर्जांपैकी एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात (आरटीआय) उघड झाली आहे.

Maratha Students, Panjabrao Deshmukh hostel scheme, allowance

संग्रहित छायाचित्र

एकीकडे राज्य सरकार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शेकडो कोटींचा निधी देत असल्याचा दावा करत आहे. मात्र, २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ५८,५०२ अर्जांपैकी एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात (आरटीआय)  उघड झाली आहे. 

तंत्रशिक्षण संचालकांनी अधिकृतपणे ही माहिती दिली. या माहितीवरून राज्य सरकार आर्थिक मागास प्रवर्ग (ईबीसी) मध्ये पात्र असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या व वसतिगृह न मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेतील पात्र ५८ हजार ५०२  विद्यार्थी राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेंतर्गत एकाही विद्यार्थ्याला लाभ मिळणार नाही. गेल्या आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये एकूण ६७,१४५ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून १३० कोटी ७६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेंतर्गत सुमारे १००  कोटी रुपयांचे बजेट आहे. परंतु, अद्याप वितरित केले गेलेले नाही.

१३ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेंतर्गत राज्यातील मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, औरंगाबाद येथील सर्व शहरातील खासगी वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भत्ता प्रस्तावित केला होता. ५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन दराने भत्ता देण्यात येईल. परंतु अचानकपणे १३ ऑक्टोबर २०१६  रोजी शासनाच्या नवीन ठरावानुसार गेल्या ७ वर्षांपासून खासगी वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह देखभाल भत्ता देण्यात येत आहे.

याबाबत दीपू फाऊंडेशनचे संस्थापक अमर अनिता जालिंदर एकड म्हणाले,  सरकारच्या चुकीच्या कारभाराच्या धोरणामुळे, २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील ५८ हजार ५०२ विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही.  विद्यार्थी आर्थिक संकटात असल्याने प्रचंड मानसिक तणावात आहेत. तथापि, शासनाने ५ जानेवारी २०२४  रोजी प्रमाणपत्र काढून वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या, वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५० कोटी रुपयांची गरज आहे, परंतु आजपर्यंत त्यांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत.

नाव न सांगण्याच्या अटीवर तंत्र शिक्षण संचालनालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, "डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी राज्य सरकारच्या निकषांनुसार विद्यार्थ्याला व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळाला पाहिजे. (डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन)  गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२२-२०२३ एकूण ६७,१४५  विद्यार्थ्यांना लाभ झाला असून त्यासाठी १३० कोटी ७६ लाख ६८ हजार रुपये वाटप करण्यात आले, हे खरे आहे.  वसतिगृहात प्रवेश नसलेल्या विद्यार्थ्यांनाच ही वसतिगृह भत्ता योजना लागू होईल. आम्ही निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला निधी मिळाला नाही.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजना

आर्थिक वर्ष - २०१८-१९
विद्यार्थी - ४१,५२९
वाटप केलेला भत्ता - रु. ८५८ कोटी ३९ लाख

आर्थिक वर्ष - २०१९-२०
विद्यार्थी - ५५, १३९
वाटप केलेला भत्ता - रु. ११२ कोटी १९ लाख

आर्थिक वर्ष - २०२०-२१
विद्यार्थी - ३८,३९८
वाटप केलेला भत्ता - रु. ५९ कोटी १६ लाख

आर्थिक वर्ष - २०२१-२२
विद्यार्थी - ५१,२९३
वाटप केलेला भत्ता - रु ८५ कोटी ४६ लाख

आर्थिक वर्ष - २०२२-२३
विद्यार्थी - ६७,१४५
वाटप केलेला भत्ता - रु. १३० कोटी ७६ लाख

आर्थिक वर्ष - २०२३-२४
विद्यार्थी - ५८, ५०२
वाटप केलेला भत्ता - शून्य (रु. 0) 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest