...हे तर नावालाच राजे, भाजपसमोर झुकले

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम (Baba Atram) यांनी गुरुवारी सकाळी सकाळीच मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Fri, 12 Apr 2024
  • 04:55 pm
Vijay Vadettiwar

...हे तर नावालाच राजे, भाजपसमोर झुकले

धर्मराव बाबा अत्राम यांनी केलेल्या भाजप प्रवेशाच्या आरोपावर विजय वडेट्टीवार संतापले

#नागपूर : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम (Baba Atram) यांनी गुरुवारी सकाळी सकाळीच मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्या भाजपसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्या चर्चांचा मी साक्षीदार आहे. मी आदिवासी माणूस आहे. आदिवासी खोटे बोलत नाही. वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे राईट हँड आहेत. त्यामुळेच ते भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट धर्मरावबाबा अत्राम यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत. धर्मरावबाबा यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजप गडचिरोलीत पराभूत झाले तर मंत्रिपद जाईल ही भीती असल्याने बिनबुडाचे आरोप सुरू आहेत, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी ते अत्राम यांच्यावर चांगलेच भडकले होते. गडचिरोली मतदारसंघ काँग्रेसमय झाला आहे. या मतदारसंघात भाजपचा पराभव दिसत आहे. गडचिरोलीत पराभव झाला तर आपले मंत्रिपद जाईल याची धर्मराव बाबा अत्राम यांना भीती वाटत आहे. म्हणूनच ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना ही बुद्धी कुठून सूचली? गडचिरोलीत मी तळ ठोकून आहे म्हणूनच मला त्रास देण्यासाठी हा आरोप केला जात आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

लीड मिळवून दाखवा, आव्हान देतो

या मतदारसंघात भाजपला लीड मिळवून दाखवा. माझे धर्मराव बाबा अत्राम यांना आव्हान आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी माझी जर धर्मराव बाबांसमोर चर्चा झाली असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा, असे आव्हानच वडेट्टीवार यांनी दिले. तुम्हाला महायुतीत कोणी कुत्रे विचारत नाही. उद्या तुम्हाला उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नाही. तुमची लोकसभा निवडणुकीत गोची केली. महायुतीत जाऊन तुम्ही गुलामासारखे जगत आहात. दुसऱ्याला उगाच बदनाम करू नका, असा इशाराच वडेट्टीवार यांनी दिला आहे.

हे कसले राजे?

स्वतः बेइमानी करायची, पक्ष फोडायचे, पाप करायचे त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करायचे, हे धंदे सोडा. हे बिनबुडाचे आरोप आहेत. गडचिरोली आम्ही जिंकत आहोत. सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. पराभव समोर दिसत आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. हे नावाला राजे आहेत. त्यामुळे हे भाजप समोर झुकले. इतरांनी भाजपसमोर झुकावे अशी यांची इच्छा असेल, पण आम्ही स्वाभिमानी आहोत. काँग्रेसला जिंकून देऊ. ४ जूनला कळेल गडचिरोलीमध्ये काँग्रेस राजा आहे आणि यांची जागा यांना दिसेल, असेही ते म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest