लोकसभेच्या तिकीटवाटपावरून ‘मविआ’त आता धूसफूस सुरू
#मुंबई
भारतीय जनता पक्षाला रोखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात एकत्र आलेल्या काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये योग्य समन्वय नसल्याने त्यांच्यात कायम वादाच्या फेरी झडत असतात. गेल्या काही आठवड्यांपासून या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये या ना त्या कारणावरून वाद सुरू आहेत. आता या महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य तिकीटवाटपावरून धूसफूस सुरू झाली आहे.
‘‘येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा १९ जागांचा आकडा कायम राहील. कदाचित त्याहून अधिक जागांवर आम्ही निवडणूक लढवू,’’ असे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘‘कोणत्याही जागेवर कोणाची मक्तेदारी नसते. महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे,’’ असे सूचक वक्तव्य केले होते.
जागावाटपावरून महाविकास आघाडीत आतापासूनच धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना रविवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे १९ खासदार निवडून आले होते. तो आकडा आम्ही कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू. यामुळे कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. कदाचित आमचा हा आकडा आणखी वाढूही शकतो.’’
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप १५० जागा जिंकणार, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यावर भाजप पूर्ण राज्यात १५० नगरसेवक जिंकून आणणार असतील, असा टोला संजय राऊतांनी लगावला. ‘‘भाजपला एवढाच आत्मविश्वास असेल तर मुंबई महापालिका निवडणूक घेण्यास त्यांची एवढी का फाटते? निवडणुका पुढे ढकलण्यासाठी न्यायालयाच्या खांद्यावर का बंदूक ठेवता,’’ असेही त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले.
भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात यावे, असे आव्हान राऊतांनी दिले. ते म्हणाले, ‘‘कर्नाटकात २०० जागा जिंकणार, असा दावा भाजपने केला होता. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अख्खी फौज बोलावण्यात आली होती. फक्त राष्ट्रपतींना बोलवायचे तेवढे बाकी राहिले होते. आता मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप अख्खी फौज बोलावेल. मात्र, त्याचाही त्यांना फायदा होणार नाही. मुंबईत आमचा पक्षच पुन्हा सत्तेवर येईल.’
म्हणे, तरीही आमची वज्रमूठ भक्कम!
‘‘महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आहे? कोण लहान भाऊ आहे?, हे पाहण्यासाठी आता डीएनए टेस्ट करावी लागेल. अजित दादा काय म्हणतात किंवा कोण काय म्हणतो, याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात. महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम आहे,’’ असा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबरच ‘‘आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे आधी लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा करायला हवी,’’ अशी भूमिका घेत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली १९ जागांची मागणीही लावून धरली.
’वृत्तसंस्था