वाघाचा दात, गळ्यातली माळ अन् एक विधान; संजय गायकवाडांना चांगलंच पडलं महागात, नेमकं काय घडलं?
बुलढाणा : शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) वादग्रस्त विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. हेच गायकवाड पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. आपल्या गळ्यात घातलेल्या माळेमधील दात हा आपण शिकार केलेल्या वाघाचा असल्याचे विधान शिवजयंतीच्या दिवशी एका कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी केले. गायकवाड यांच्या या विधानानंतर वनविभागाने या प्रकरणी त्यांची चौकशी करणार असल्याचे समजते. आपणच वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यातील माळेत घातल्याचे संजय गायकवाड यांचे म्हणणे आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
शिवजयंतीनिमित्त बुलढाण्यातील कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांपैकी एक असलेले गजानन शास्त्री यांनी संजय गायकवाड यांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचं विधान केलं होतं. त्यावर संजय गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले की, १९८७ मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती. शिकारीनंतर वाघाचा दात काढून गळ्यात घातला. त्यांच्या या विधानावर गायकवाड यांना विचारण्यात आले की, शिकार केलेला वाघ होता की बिबट्या? त्यावर गायकवाड म्हणाले की, मी वाघाची शिकार केली होती. बिबट्या वगैरेंना तर मी असेच पळवून लावत होतो.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात शिवजयंती कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आमदार गायकवाड शिवरायांच्या मावळ्याचा पेहराव करून आणि हाती तलवार घेऊन कार्यक्रमस्थळी आले होते. डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा, हातात तलवार असा त्यांचा पेहराव होता. यावेळी गायकवाड यांनी त्यांच्या गळ्यातील एका लॉकेटबाबत दावा केला की त्यात वाघाचा दात आहे. त्यांनी ३७ वर्षांपूर्वी एका वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातला आहे. दरम्यान, वन विभागाने गायकवाड यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून या प्रकरणी कारवाई होऊ शकते. वृत्तसंस्था