साईबाबांच्या सुटकेला स्थगिती देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

उच्च न्यायालयाचा निर्णय तर्कसंगत असल्याचे नोंदवले निरीक्षण

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Tue, 12 Mar 2024
  • 11:55 am
SupremeCourt

साईबाबांच्या सुटकेला स्थगिती देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

#नागपूर

नक्षलवाद्यांचा म्होरक्या असल्याचा आरोप असलेल्या प्रा.जी.एन. साईबाबा आणि इतर आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली होती. या आदेशाला स्थगिती देण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. उच्च न्यायालयाचा निर्णय हा तर्कसंगत असल्याचे मतही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी.एन. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांची आजन्म कारावासासह अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली होती. तसेच या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. प्रा. साईबाबांसह इतर आरोपींवर यूपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर ५ मार्च रोजी न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मीकी मेंनझेस यांनी निर्णय सुनावला होता. यानंतर राज्य शासनाने उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात सुटकेला स्थगिती देण्यासाठी याचिका केली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यावर आता सर्वोच्च न्यायालयातही राज्य शासनाला फटका बसला आहे.

७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबासह महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर, विजय नान तिरकी व पांडू पोरा नरोटे यांना दहशतवादी कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेसह विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. २०२२ साली न्या. रोहित देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणांवरून साईबाबांची निर्दोष सुटका केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याची सूचना उच्च न्यायालयाला केली. यानंतर न्या. विनय जोशी आणि न्या. वाल्मीकी मेंनझेस यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले होते.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest