‘महाराष्ट्राचा हक्काचा पैसा राज्याला मिळालाच पाहिजे’
#मुंबई
महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे, असे ठणकावून सांगत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्र सोडले आहे. मुंबईत स्थानिक लोकाधिकार समिती मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाचे धोरण मित्रपक्ष व स्वपक्षातील नेत्यांनाही संपवण्याचे असल्याचे सांगत त्यांनी नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाचा दाखला दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय फेरी झडत असून शनिवारी ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली होती.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना काही ग्रामस्थांनी रेकॉर्ड केलेले फोन कॉल पाठवल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मला काहींनी फोन रेकॉर्ड पाठवले आहे. भाजपाकडे भाडोत्री लोक खूप आहेत. भाड्याच्या एजन्सी लावून त्यांनी फोन सुरू केले आहेत. कुणालाही फोन येतो, तुम्ही मोदी सरकारला मत देणार का वगैरे विचारतात. मग ते गरीब लोक विचारतात की आधी मला सांगा हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? मोदी काय त्यांच्या खिशातून खर्च करतात का? हा माझ्या देशाचा पैसा आहे. गॅस सिलेंडरचा दर २०१४ साली काय होता, आज काय झालाय? आता काय म्हणून मी त्यांना मत देऊ?
मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला कर म्हणून एक रुपया देतो, तेव्हा त्यातून परत फक्त ७ पैसे महाराष्ट्राला मिळतात. मग बाकीचे पैसे कुणाच्या बोडक्यावर घालताय तुम्ही? मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशांचा आहे. महाराष्ट्राला तुम्ही काय देताय? आम्ही जो एक रुपया केंद्राला देतोय, त्यातला किमान ५० टक्के वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र ओरबाडून घेत आहात. आम्हाला आमच्या हक्काचा पैसा मिळाला पाहिजे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेनं कधीच सूडाचं राजकारण केलं नाही, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण कधी सूडाचं राजकारण केलं नाही. काँग्रेसनं शिवसेना फोडली असेल, शरद पवारांनी शिवसेना फोडली असेल, आपणही राष्ट्रवादीमधली काही लोकं फोडली असतील, काँग्रेसमधले काही लोक आपल्याकडे आले असतील. पण जेव्हा सत्ता हातात आली तेव्हा यातल्या कुठल्याही पक्षानं दुसरा पक्ष संपवण्याचा कधी विचार नाही केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जिंकल्यानंतर समोरच्याला संपवून टाकेन ही पाशवी वृत्ती आता सगळीकडे जोर धरू लागली आहे. ती चिरडून टाकावी लागेल. जर्मनीत एका हिटलरचा असा शेवट झाला की आता जर्मनीत पुन्हा हिटलर जन्माला येणं अशक्य आहे. अशी ही वृत्ती चिरडून टाकायला पाहिजे. ही कसली वृत्ती आहे? तुम्ही तुमच्या विरोधकांना, मित्र पक्षांना, तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवत आहात. नितीन गडकरी असे बोलले आहेत की त्यांना पक्षात काही स्थानच राहिलेलं नाही. त्यांना सन्मान मिळत नाही. नितीन गडकरी दिल्लीत गेल्यानंतर आम्हाला आशा होती की त्यांच्या कामामुळे देशाला मोठा फायदा होईल. गडकरी जेव्हा म्हणतात की तिथे काही स्थानच राहिलेलं नाही, तर मग कुणासाठी काम करायचं?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.