आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात
#मुंबई
मराठा आरक्षणाबाबतची राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होत आहे. आरक्षणप्रश्नी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा मराठा समाज घेत आहे. यामुळे मराठा समाज आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
या संदर्भात मराठा समाजाची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीत मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मराठा समाजाने थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला 'मराठा वनवास यात्रा' नावाने संबोधले जाणार आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा राज्यात घुमणार आहे.
तसेच आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर समाज बांधव ठाण मांडून बसणार आहेत. याच ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. मराठा समाज येत्या ६ मे रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेणार आहे. याबाबतची घोषणा मराठा आरक्षण समन्वय समितीने केली आहे. मराठा आरक्षण समिती, मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज या परिषदेतून सरकारला अंतिम इशारा देणार आहेत. मराठा समाज आता वनवास यात्रेतून न्याय मागणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या गोटातून सांगण्यात आले.वृत्तसंस्था