एस टी बस
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आज अमृतमहोत्सव साजरा करत आहे. १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. अगदी खेड्यापाड्यांपासून शहरांना एकमेकांपासून जोडणारी अशी ही या लालपरीची ओळख आहे.
आत्ता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असं नावं अशी एसटीची ओळख आहे. मात्र एसटी सुरु झाली तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. त्यामुळे याचे नाव बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन असे होते. तेव्हा मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र मिळून 'बॉम्बे स्टेट' होते. त्यामुळे 'बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन' असे एसटी महामंडळाचे नाव होते. पहिल्यांदा एसटी धावणारी दोन भाग्यवान शहरे होती. ती म्हणजे अहमदनगर आणि पुणे ही शहरे होती. पहिल्या एसटी बसचा थाटचं वेगळा होता. किसन राऊत नावाच्या व्यक्तीला पहिली एसटी बस चालवण्याचा बहुमान मिळाला होता तर लक्ष्मण केवटे हे एसटीचे पहिले वाहक होते.
त्यानंतर हळूहळू एसटीमध्ये बदल होत गेले. हिरकणी, शिवनेरी, शिवशाही, विठाई आणि आता इलेक्ट्रीक बसेसही रस्त्यावर धावायला लागल्या आहेत. त्यातच राज्य सरकारने महिलांसाठी विशेष योजना काढली आहे. ज्यात महिलांना ५० टक्के तिकिट दरात सुट देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिकच सुखरक झाला असल्याचे दिसून येत आहे.
१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते. आपल्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासी सेवेमुळे एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली आहे. आज ग्रामीण भागापासून शहरी भागात देखील… pic.twitter.com/4GwWoeLbcv
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 1, 2023
याबाबत ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यात महाराष्ट्राची एसटी सेवा विस्तारली आहे. या विस्ताराचे संपूर्ण श्रेय महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालक, तंत्रज्ञ यांचे आहे. त्यांनी आपल्या लाडक्या लालपरीला हिरकणी, शिवनेरी, शिवशाही आणि विठाई या नावांसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि आज स्पर्धात्मक युगात देखील ती भक्कम उभी आहे. शासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही जीवनवाहिनी अविरत सुखद प्रवास देत राहील. लोकांच्या सुख दुःखात धावून येणाऱ्या आपल्या लालपरीने स्वतःचा अमृत महोत्सव पूर्ण केल्याचा विशेष आनंद आहे.”