पहिला दिवस विरोधकांच्या हल्ल्याचा...
# मुंबई
राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील अनपेक्षित भूकंपानंतर सोमवारपासून (दि. १७) सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारची कोंडी केली. सलामीलाच विरोधकांनी केलेल्या तीव्र हल्ल्यांमुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच अधिवेशन आजपासून सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी कामाला सुरूवात केली असून या अधिवेशनात त्यांच्यावर हल्ला चढवण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाल्याचे दिसते. त्यामुळे अधिवेशानात सत्ताधाऱ्यांचा वचरष्मा राहील, अशी शक्यता वर्तवली जात असताना पहिल्या दिवशी विरोधकांनी दिलेल्या जोरदार दणक्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला. गेल्या काही दिवसात दिवंगत नेत्यांना विधान परिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
विधान परिषदेच्या तीन आमदारांविरोधात सचिवांना पत्र देत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने त्यावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. ‘‘प्रस्ताव असा मांडता येत नाही. नीलम गोऱ्हेंविरोधात प्रस्ताव मांडायचा असेल तर, त्याची प्रक्रिया असते. कायद्यातील तरतुदीनुसार असा प्रस्ताव मांडता येईल. मात्र, त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता येणार नाही,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला. दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश बापट, दिवंगत खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार शंकरराव वाकुळणीकर, बाबुराव वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियुक्ती केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला. स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘‘दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. बोगस बियाणांच्या विरोधात कायदा अधिक कडक करण्यात येणार आहे.’’