आत्ताचे महाराज वारसदार नाहीत, ते दत्तकच...

कोल्हापुरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती (Shrimant Shahu Chhatrapati) यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांना पुन्हा संधी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Fri, 12 Apr 2024
  • 03:35 pm
Sanjay Mandalik

संग्रहित छायाचित्र

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान, कोल्हापुरात पुन्हा गादीवरून शब्दसंग्राम ! आरोप-प्रत्यारोपांना आले उधाण

कोल्हापूर : कोल्हापुरात राजकीय वातावरण तापण्याची जोरदार शक्यता आहे. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपती (Shrimant Shahu Chhatrapati) यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. तर भाजपने खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांना पुन्हा संधी दिली. दरम्यान प्रचारसभेदरम्यान खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिक यांनी एक विधान केले आहे. संजय मंडलिक म्हणाले, आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का?, ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि कोल्हापूरची जनता खरी वारसदार आहोत. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला आहे.

संजय मंडलिक यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता शाहू छत्रपती याला कसे उत्तर देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी व्यक्तिगत टीका टाळा म्हणून हसम मुश्रीफ यांनी सल्ला दिला होता. मात्र प्रचारात व्यक्तिगत टीका होत असल्याची चर्चा आहे.

मंडलिक यांच्या विधानावर भाजपची प्रतिक्रिया काय?

संजय मंडलिक यांच्या विधानावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “संजय मंडलिक यांचा हेतू हा छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा नक्कीच नसावा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती वंशाचा पुरावा मागितला होता हे विसरलात का? भाजपने छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा दिली तेव्हा स्वत: शरद पवारांचे वक्तव्य वादग्रस्त नव्हते का? आधी छत्रपती हे पेशव्यांची नेमणूक करायचे आणि आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करत आहेत. हा छत्रपती घराण्याचा पवारांनी केलेला अपमान होता ना? तेव्हा उगाच राजकीय विषय नसल्याने अशा विषयांना मोठे करण्याचा हेतू आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

जाब विचारा अन्यथा कोल्हापुरी भाषेत उत्तर- सतेज पाटील

संजय मंडलिक यांनी छत्रपतींच्या घराण्याचा अपमान केला असून हे कदापि सहन केले जाणार नाही. त्यांना कोल्हापूरकर मतपेटीतूनच उत्तर देतील. तसेच मंडलिकांना  छत्रपतींच्या घराण्यावर अशी वैयक्तिक पातळीवर टीका करण्यासाठी कोणी सांगितले याचा महायुतीतील लोकांनी शोध घ्यावा आणि मंडलिकांना त्यांनी याचा जाब विचारावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली आहे. संजय मंडलिकांच्या शाहू  छत्रपती  यांच्यावरील टीकेनंतर सतेज पाटील माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले होते. त्यांनी म्हटले की, "मंडलिकांचे अशा पद्धतीचे अपमानास्पद वक्तव्य कधीही सहन केले जाणार नाही. या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ यांनी जाहीररित्या सांगितले होते की, शाहू महाराजांबद्दल वैयक्तिक टीका करणार नाही. अशा सूचना देऊनही संजय मंडलिक यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणुकीत लाखाच्या पुढे लीड वाढत चालल्याने त्यांनी अशा पद्धतीचे विधान केले आहे, पण कोल्हापूरकर हे कदापि सहन करणार नाहीत. याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घेऊन माफी मागावी. त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील. 

संजय मंडलिकांच्या नेत्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना कोणी चिठ्ठी लिहून दिली होती का? हे पाहावे, आम्ही स्पष्टपणे कोल्हापुरी भाषेत उत्तर द्यायची वेळ आली तर देऊ. त्यामुळे याचे पडसाद कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात उमटतील. प्रवीण दरेकरांनी मंडलिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू नये, त्यांनी माफी मागावी. छत्रपती घराण्याचा अपमान त्यांनी केला आहे. या अपमानाचा निषेध कोल्हापूरकर म्हणून आम्ही करतो, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

संजय मंडलिक नेमके काय म्हणाले?

“मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? आता जे महाराज साहेब आहेत ते कोल्हापूरचे आहेत का? खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तकच आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. खरे वारसदार तुम्ही, आम्ही आहोत. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आपण जपले. ही भूमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आहे. शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला. समतेचा विचार शिकवला. या हवेत, पाण्यात गुण आहेत की या जिल्ह्यातील नागरिकांना जन्मत: शाहू विचार आहेत, असे संजय मंडलिक म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest