बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर मागे
#नवी दिल्ली/ मुंबई
ग्रामीण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देताना बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेतली. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी तामिळनाडूतील जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन केले. या निर्णयाचे ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत करण्यात आले.
डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
याबाबतच्या सर्व बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्यावर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली. तसेच तामिळनाडू सरकारच्या कायद्याची वैधता कायम ठेवली आहे. ज्यात राज्यातील पारंपरिक जल्लीकट्टूला परवानगी आहे, असे मत खंडपीठाने नोंदवले.
न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ म्हणते की, आम्ही विधिमंडळाच्या निर्णयात अडथळा आणणार नाही. विधिमंडळाने हा राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा भाग असल्याचे मत व्यक्त केले आहे. निकाल देताना न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस म्हणाले की, कायद्याने प्राण्यांशी संबंधित परंपरांना परवानगी दिली जाऊ शकते की नाही, हे ठरवण्यासाठी कायदेमंडळ योग्य आहे, या आधारावर कार्यवाही केली आहे. मात्र, कोणत्याही दंडात्मक कायद्याचे उल्लंघन होत असेल तर अशा परंपरांना परवानगी देता येणार नाही.
या निर्णयाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बैल हा धावणारा प्राणी असल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सॉलिसिटर जनरल यांनी सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने राज्याचा कायदा पूर्णपणे योग्य ठरवलेला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत पूर्णपणे चालणार आहे. हा शेतकऱ्यांचा विजय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे. आम्ही सगळे आनंदी आहोत, या कारवाईच्या दरम्यान आमदार महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, राहुल कुल यांनी प्रचंड मेहनत घेतली, पाठपुरावा केला.
बैलगाडा मालकांच्या बाजूने सातत्याने भूमिका घेणारे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस असून सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले. राज्य सरकारने सकारात्मक निर्णय दिल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या, संघटनांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झाले. बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू झाल्याबद्दल यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
त्यांनी सांगितले की, बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बैलगाडा मालकांचे कष्ट, बैलांसोबत असलेलं त्यांचं प्रेमळ नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.