प्राचीन बुद्ध विहाराची नोंद त्वरित करावी
#गारगोटी (जि. कोल्हापूर)
परिसरातील भूदरगड किल्ल्याच्या पायथ्याला अखंड दगडातील एक बुद्ध विहार सापडले आहे. त्याचप्रमाणे येथे अनेक नैसर्गिक गुफासुद्धा आढळल्या आहेत. याची नोंद पुरातत्त्व विभागाने त्वरित करावी, अशी मागणी भूदरगड तालुका बुद्ध सांस्कृतिक अवशेषाचे जतन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बुद्ध विहार संवर्धन समितीने केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांच्या संशोधनातून भूदरगड किल्ल्याच्या पायथ्याला अखंड दगडातील एका बुद्ध विहाराचा शोध लागला. येथे नैसर्गिक गुफादेखील आहेत. भूदरगड तालुक्यामध्ये प्राचीन दोन हजार वर्षांपूर्वीच्या बुद्ध संस्कृतीच्या खुणा सापडत असल्यामुळे इतिहास अभ्यासकांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या सर्व सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन व्हावे, अशी मागणी बुद्ध विहार संवर्धन समितीकडून करण्यात आली.
अलीकडेच भूदरगड तालुका बुद्ध सांस्कृतिक अवशेषाचे जतन करणारी समिती स्थापन झाली असून दर आठवड्याला उत्साही सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी मागोवा घेत आहेत. या समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. २६) सूर्योदयापूर्वीच बुद्ध विहाराला भेट देऊन विहाराची आतील तसेच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई केली. विहाराबाहेरील बाजूच्या दगडी भिंती गवताने भरलेल्या होत्या. त्या स्वच्छ केल्यावर हा गुलाबी रंगाचा कातळ असल्याचे दिसून आले. समितीच्या सदस्यांमार्फत परिसर स्वच्छ करण्यात आल्यावर सर्वांनी बुद्ध वंदना तसेच जिजाऊ वंदना म्हणत आनंद व्यक्त केला.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉक्टर सुभाष देसाई म्हणाले, ‘‘भूदरगड तालुक्यामध्ये पालीच्या नैसर्गिक गुफा आहेत. त्यांच्यासह भूदरगड किल्ल्याच्या तटाखालील गुफा, पाटगावचा मठ सिद्धोबाची गुहा अशी अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकासित करायला हवी. त्याचबरोबर बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत शुद्ध स्वरूपातला हिंदू धर्म पाहायचा असेल तर तो बुद्ध धर्म होय. बुद्ध हा साऱ्या जाती-धर्माच्या पलीकडचा होता. त्याच्या धम्मामध्ये उपालीसारखा न्हावी होता तर सारीपुत्तसारखे ब्राह्मण सेनापतीही होते. त्यामुळे बुद्धाला विशिष्ट जातीत बांधून ठेवू नका. बुद्ध हा आजच्या युगाचा मंत्र व्हायला हवा.’’ राजेंद्र यादव, डॉ. राजीव चव्हाण, एस. टी. कांबळे, शरद बोरवडे, एस. बी. शिंदे, दीपक राजरत्न यांनीही चर्चेत भाग घेतला. वृत्तसंंस्था