संग्रहित छायाचित्र
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काँग्रेसच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज भरले. मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी आपला अर्ज मिरवणूक काढून सादर केला. त्यांच्याबरोबर हजार लोकांनी पदयात्रेत सहभाग घेतला, तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बाबा मिस्त्री यांनी प्रहारतर्फे अर्ज दाखल केला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी आपला अर्ज दाखल केला, तर याच मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) उमेदवारी अर्ज सादर केला.
मध्य मतदारसंघातून स्वराज्य पक्षातर्फे महेश काळजे यांनी अर्ज सादर केला. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा राजीनामा दिला. दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. कारण त्यांचा एबी फॉर्म आला नसल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लावला. मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे राजू खरे यांनी आपला उमेदवार मोहोळ येथे सादर केला. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यात आता लढत होणार आहे. मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सिद्धेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.