ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात
#मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप सरकारने बुधवारी (दि. २१) उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यामुळे राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार, यापुढे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना ‘झेड’ऐवजी ‘वाय’दर्जाची सुरक्षा मिळेल. सरकारने मातोश्रीवरील सुरक्षारक्षकांच्या संख्येतदेखील कपात केली आहे. तसेच ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट गाडी आणि पायल व्हॅनही कमी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य आणि तेजस यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅनही कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गृह विभागाने या सुरक्षा कपातीसाठी कोणतेही कारण दिलेले नाही. यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज्याचे गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
सरकारच्या या निर्णयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘‘सरकारच्या या निर्णयाचे आम्हाला कोणतेही आश्चर्य वाटत नाही. हे सरकार सूडबुद्धीचे राजकारण करण्यात आपली शक्ती खर्च करत आहेत. त्यांची ही कृती अपेक्षितच होती. एका सन्मानीय पक्षप्रमुखाची सुरक्षा अशा पद्धतीने करून मुख्यमंत्री आपला लैकिक कमी करुन घेत आहेत,’’ असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला सुनावले. आमच्या पक्षप्रमुखांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आमचा प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था