ऊसतोडणी कामगारांना डांबले, अत्याचारातून महिला गर्भवती
#पंढरपूर
महाराष्ट्रातील पंढरपूर तालुक्यात वेठबिगारीची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नंदुरबारमधील ऊसतोड कामगारांना त्यांच्या तीन मुलांसह विनायक शिरतोडेंद्वारे पंढरपूर तालुक्यातील गुरसाल गावात बंदी बनवून डांबून ठेवण्यात आले आहे.
हे कुटुंब गेल्या वर्षीपासून पंढरपुरातील आष्टी साखर कारखान्यात ऊसतोडणीचे काम करत आहे. महिलेवर आरोपी शिरतोडेद्वारे सातत्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. यामुळे महिला गरोदर राहिली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजल्यापासून आरोपीद्वारे पीडीतांना धमक्या देण्यात येत आहेत.
पश्चिम भारत मजदूर अधिकार मंचाच्या गणेश वाघमारे यांच्यामार्फत पीडित कुटुंबियांच्या वतीने पंढरपूर (ग्रामीण) पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानंतर आरोपी आणि डांबून ठेवलेल्या मजुरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. परंतु कामगारांची सुटका करून त्यांना परत पाठवण्याऐवजी पोलिसांनी त्यांना पुन्हा आरोपीच्या ताब्यात सोपवले. आरोपी विनायक शिरतोडेंच्या म्हणण्याप्रमाणे त्याने या कामगारांच्या टोळी मुकादमाला आगाऊ रक्कम दिलेली आहे. ती परत मिळाल्याशिवाय तो कामगारांना परत जाऊ देणार नाही. याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य सुधीर कटियार यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
वृत्तसंस्था