कोल्हापुरात घरे, दुकानांवर दगडफेक

काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा हातात न घेण्याची विनंती नागरिकांना विनंती केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका लक्षात घेता कोल्हापूर जिल्ह्यात १९ जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 8 Jun 2023
  • 07:35 am
कोल्हापुरात घरे, दुकानांवर दगडफेक

कोल्हापुरात घरे, दुकानांवर दगडफेक

औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्यानंतर आंदोलकांची दगडफेक, शहरात तणाव, जिल्ह्यात १९ जूनपर्यंत जमावबंदी

#कोल्हापूर

काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा हातात न घेण्याची विनंती नागरिकांना विनंती केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका लक्षात घेता   कोल्हापूर जिल्ह्यात १९ जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह स्टेट्सविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी (दि. ७) आंदोलन पुकारले. सकाळी ११ वाजतापासून शिवाजी चौक परिसरात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र परिसर दणाणून सोडला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करत आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक घरी जात असताना शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी विशिष्ट घरे, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जमाव आक्रमक झाल्याने त्याला पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

सध्या कोल्हापूर शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत स्वतः रस्त्यावर उतरून जमावास आवरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. ज्या लोकांनी दगडफेक, हुल्लडबाजी केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही तपासाला सुरूवात केली आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. नागरिकांनी भयमुक्त रहावे, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असेही अधीक्षक म्हणाले.

हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरात कडकडीत बंद होता. हा बंद मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्ववादी संघटनांना केले. परंतु हिंदुत्ववादी संघटना बंद ठाम राहिल्या. सकाळपासून शहरातील अनेक ठिकाणी शुकशुकाट होता. जिल्हाबंदीचा आदेश लागू करताना प्रशासनाने म्हटले आहे की, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे हद्दीतील काही तरुणांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे काही आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडण्याचे नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात १९ जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर कोल्हापूर शहर कडकडीत बंद आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटना शिवाजी चौक परिसरात जमले आहेत. शहरात सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व भागातील दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या, रिक्षा, बस, वाहतूक बंद आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे शिवाजी चौक महापालिका परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे शांततेचे आवाहन

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘कोणीही कायदा हातात घेऊ नये. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. राज्यकर्त्यांनीही त्यांचे अनुयायी व कार्यकर्त्यांना समजावून सांगावे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. स्थिती सध्या पूर्ण नियंत्रणात आहे. कोणाचे काही गैरसमज असतील, काही मागण्या असतील तर त्यातून चर्चेतून मार्ग काढू. शासन जी माहिती देईल, तिच खरी मानावी. इतर कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नये.’’

दंगली घडवल्या जात आहेत, सरकारचेच अशा गोष्टींना प्रोत्साहन : शरद पवार

राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. अलीकडे, एक घटना संगमनेर येथे घडली तर दुसरी घटना कोल्हापूरला. या घटना जाणुनबुजून घडवल्या जात आहेत. राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पवार  यांनी संगमनेर येथे दोन गटात झालेली दगडफेक तर कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून निर्माण झालेला तणाव या दोन्ही घटनांवर शरद पवारांनी परखड भाष्य केले. ‘‘गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणीवपूर्वक घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायची काय गरज? पुण्यात कोणाला याविषयी पडले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल, हे पाहिले जात आहे. राज्यात संगमनेर आणि कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोणीतरी मोबाईलवर मॅसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करून राजकारण करणे चांगली गोष्ट नाही,’’ असे पवार यांनी सुनावले.

औंरग्यांच्या औलादींचा शोध घेणार : देवेंद्र फडणवीस

औंरग्यांच्या अचानक इतक्या औलादी कशा पैदा झाल्या, याचा आम्ही शोध घेणार आहोत असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर दिला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या औलादी कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असे ते म्हणाले.

औंरग्यांच्या औलादींना सोडणार नाही, त्यांचे उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसे झाले तर राग अनावर होतोच. महाराष्ट्रात कायदा आणि सुवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोण करत आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहनदेखील त्यांनी केले.

औरंगजेबाचे उद्दातीकरण खपवून घेतले जाणार नाही, हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, औरंगजेब कोणाला जवळ वाटतो, हे सर्वांना माहित आहे, याचीदेखील चौकशी केली पाहिजे, अशी सूचक प्रतिक्रियादेखील फडणवीस यांनी दिली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात १९ जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest