राज्यसरकार दिल्ली वारीत व्यस्त, राज्य सोडले वाऱ्यावर: रोहित पवार
#पुणे
महाराष्ट्रात कायदा आाणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकार दिल्ली दौऱ्यात व्यस्त असून राज्याला मात्र वाऱ्यावर सोडले गेले आहे, अशी घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
राज्याची कायदा व्यवस्था राखण्यासाठी सरकार लोखंडी हाताने काम करणार का, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना , घडामोडींसदर्भात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘‘राज्यात धार्मिक जातीय दंगे होऊन सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे,’’ असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या वृत्तपत्राची कात्रणं त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला.
रोहित पवार म्हणाले, ‘‘जळगावमध्ये भर दिवसा स्टेट बँकेवर दरोडा, सांगलीमध्ये पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकून १४ कोटीचा ऐवज लंपास, राज्यात अनेक भागात कोयता गँगचा हैदोस सुरूच असून त्यांच्या दहशतीत लोक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. एकीकडे महिला सन्मानाचा जागर सुरू असताना दुसरीकडे महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, धार्मिक-जातीय दंगे होऊन सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे... एकंदर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्य सरकार दिल्ली वारीत व्यस्त असून राज्याला मात्र वाऱ्यावर सोडलं आहे.’’
वृत्तसंस्था