संग्रहित छायाचित्र
शेतकरी, सामान्य नागरिकांच्या हितासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी १८ एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्कची आवश्यकता आहे. यामुळे राज्यातील ४३ हजार ७२२ गावांतील कोट्यवधी लोकांना थेट मोबाईलवर ढगफुटी, गारपीट, किती मिलिमीटर पाऊस, किती वाजता, कोणत्या अक्षांश व रेखांशवर होणार याची अचूक माहिती देता येणे शक्य होईल, त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच, यामुळे आर्थिक, जीवितहानी टाळता येऊ शकते, असे हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी ‘सीविक मिरर’ ला सांगितले.
महाराष्ट्रापेक्षा एक षष्टांश क्षेत्रफळाच्या हिमाचल प्रदेशला तीन एक्स बॅंड डॉप्लर रडार बसविले गेलेत. डॉप्लर रडार जे अगदी बोटाच्या पेराएवढ्या लहान आकारमानात किती पाणी, बर्फ कण व बाष्प आहे याची माहिती अचूक देते. मान्सून पॅटर्नच्या बदलाबरोबरच सौर वादळांच्या प्रभावामुळे राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, वाशिम, हिंगोली, रत्नागिरी आदी विविध विभागातील विविध जिल्ह्यात मोठ्या संख्येने ढगफुटी होत आहेत. वातावरणातील अस्थिरतेने ‘क्युम्युलोनिंबस’ ( उंच उंच किलोमीटर अंतराच्या) ढगांची निर्मिती होते. विजांचा गडगडाट व लखलखाटासह कमी कालावधीत ताशी शंभर मिलिमीटर दराचा नुकसान करणारा घातक पाऊस होत आहे. कुठे ढगफुटीचे पूर (फ्लॅशफ्लड) तर कुठे गारपीट होत आहे. त्यातच देशात व राज्याच्या खूप मोठ्या भागात दुष्काळाने लोक होरपळून निघाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी योग्य निर्णय घेत काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीचे माजी शास्त्रज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
एक्स बँड डॉप्लर रडार आवश्यक
एक्स बँड व डॉप्लर रडार आवश्यक आहे. ढगांचा एक्स रे काढत बोटांच्या पेराएवढ्या आकारमानाच्या ढगात किती बर्फ, कण, पाण्याची वाफ (बाष्प) आणि पाण्याचे थेंब आहेत याची संपूर्ण माहिती मिळते. परिणामी कोणत्या अक्षांश- रेखांशावर किती वाजता, किती मिलिमीटर पाऊस पडेल. ढगफुटी होणार की दुष्काळ पडणार, देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कसा, किती परिणाम होणार याची माहिती अत्यंत अचूक मिळते. सी बँैड डॉप्लर रडार मराठवाड्यात बसविण्याच्या हालचाली सुरू आहे. त्याचा मराठवाड्यात उपयोग नाही. तेव्हा जनहित लक्षात घेत संपूर्ण भारतासाठी राष्ट्रीय एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्कची गरज असल्याचे प्रा. जोहरे यांनी सांगितले.
एक्स बँड डॉप्लरची गरज
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. लालफितीच्या कारभारात एक्स बँड डॉप्लर रडार अडकले आहेत. अधिकारी वर्ग अवैज्ञानिक कारणे देत जनतेची व राज्यकर्त्यांची दिशाभूल करीत आहेत. सी बॅंड डॉप्लर रडार हे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी उपयोगी नाहीत. तेथे एक्स बॅंड डॉप्लर रडार बसविणे तातडीने गरजेचे असल्याचे जोहरे यांनी सांगितले.