संग्रहित छायाचित्र
पुणे: फेब्रुवारी नंतर एल निनोची (El-Nino) स्थिती हळूहळू कमजोर पडत जाईल. त्यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. (Latest News)
भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले, प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती फेब्रुवारी अखेर पर्यंत सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तेथील समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरी तापमानापेक्षा जास्तच राहील. फेब्रुवारी अखेरनंतर एल निनो हळूहळू कमजोर होत जाईल. तसे झाल्यास यंदाच्या पावसाळी मोसमात पाऊस चांगला पडेल याची शक्यता वाढली आहे.
ख्रिसमसच्या दरम्यान म्हणजेच डिसेंबर अखेर दक्षिण अमेरिकेतील प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. या तापमान वाढीमुळे हवामानात काही बदल होतात. अशा हवामान बदलास एल निनो असे म्हणतात. एल निनो हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ 'लहान मूल' असा होतो. एल निनोचा भारताच्या मान्सूनवर थेट परिणाम होत असतो. एल निनोच्या सक्रिय आणि असक्रियतेवर भारतात पडणाऱ्या पावसाची स्थिती अवलंबून असते.
फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरी २२.७ मिमी पाऊस पडतो. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सरासरीच्या तुलनेत ११९ टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच राज्याच्या मुख्यत: विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यांत देशभरात सरासरी ७.२ मिमी पाऊस पडला.