तर केसीआर संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार!
#पुणे
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांची काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली. या सभेनंतर केसीआर यांनी संभाजीनगरमधूल लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. तेथील जनतेमधून अशी मागणी झाल्यास केसीआर हे संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे संकेत बीआरएसकडून सोमवारी (दि. ५) देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या केसीआर यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला. ही सभा बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील पूर्वीच्या सभांप्रमाणे रेकाॅर्डब्रेक गर्दीची होती, असा दावा बीआरएसकडून करण्यात येत आहे. ‘‘राव यांच्या सभेनंतर अनेकांनी त्यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. राव यांनी त्या सर्वांच्या भावना समजून घेतल्या. या मतदारसंघातील नागरिकांची इच्छा असल्यास बीआरएसतर्फे राव छत्रपती संभाजीनगरमधून नक्कीच लोकसभा निवडणूक लढवतील,’’ असे सध्या महाराष्ट्रात या पक्षाची धुरा सांभाळत असलेले बीआरएसच्या किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी पुण्यात सांगितले. १९९९ ते २०१४ अशी सलग २० वर्षे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१९ मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंचा पराभव करीत बाजी मारली होती. राव यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लढण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा थेट सामना वर्तमान खासदार इम्तियाज जलील यांच्याशी होईल.
आगामी काळात महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका, जिल्हा परिषदेसह अन्य सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) सोमवारी जाहीर केला. याबाबतची घोषणा माणिक कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बीआरएसचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी. जे. देशमुख, पुणे जिल्हा समन्वयक राहुल काळभोर, शुभम देशमुख आदी उपस्थित होते. माणिक कदम म्हणाले, ‘‘भारतात बीआरएसच्या रूपात पहिल्यांदाच पक्ष कार्यकर्त्यांची नोंदणी डिजिटल स्वरूपात करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यामध्ये अवघ्या पाच दिवसांत १ लाख ८८ कार्यकर्ते बीआरएससोबत जोडले गेले आहेत.’’
बीआरएस शेतकऱ्यांसाठी काय करते?
बीआरएसमुळे तेलंगणातील ९९ टक्के शेतकरी आत्महत्या थांबल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांना २४ तास वीज मोफत दिली जात आहे. पेरणीसाठी सरकारकडून दहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत पाच लाख रुपये दिले जातात. उत्पादन जास्त झाल्यास हमीभावाने शेतमालाची खरेदीही तेलंगणा सरकार करते. यासह अन्य सुविधाही शासनाने दिल्या आहेत. शेतकऱ्यांसह सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील जनतेचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही माणिक कदम आणि बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
वृत्तसंस्था