संग्रहित छायाचित्र
नाशिक: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. आम्हाला ती त्रिवार मान्य नाही. आता भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी (दि. २३) दिला.
शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीची माती मी अयोध्येला सोबत घेतली होती. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. काल कोणीतरी पंतप्रधानांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. मात्र, हे अजितबात सत्य नाही. त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज अयोध्येत श्रीराम मंदिर बनले नसते, असा दावादेखील ठाकरे यांनी केला.
श्रीराम कोणत्या एका पक्षाचे असूच शकत नाही. असेकरण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आपल्याला ते मुक्त करावे लागणार आहे. म्हणजे भाजपमुक्त श्रीराम आपल्याला करावा लागणार आहे. प्रभू राम हे एकवचनी होते. मात्र, शिवसेनेला दिलेले वचन मोडणारे रामभक्त कसे असू शकतात, असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
यावेळी ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘‘शिवसेना मला वडिलोपार्जित मिळाली... वारशाने मिळाली. आम्ही प्रयत्न केला म्हणून आज भाजप सत्तेत आहेत. मोदी पंतप्रधान व्हावे, म्हणून आम्हीदेखील प्रचार केला होता. त्या वेळी आम्ही घोटाळेबाज नव्हतो का,’’ असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.
७५ वर्षांत काँग्रेसने काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आता दहा वर्षांत काय केले, याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. ‘राम की बात झाली, आता काम की बात करो,’ असे आवाहनदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. आमच्यावर काँग्रेससोबत गेल्याचा आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्यावर हिंदूत्त्व सोडण्याचा आरोप करत आहात. ३० वर्षे भाजपसोबत राहिल्याने आम्ही निर्लज्ज भाजपवाले झालो नाही, तर काँग्रेससोबत राहून काँग्रेसवाले काय होणार, असेही ठाकरे यांनी सुनावले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना बालीशी केली. सध्या सर्व वातावरण राममय झाले आहे. मात्र, शिवसेना संपवू पाहणाऱ्यांचा वध करावा लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.
पीएम केअर फंडातील पैसा कुठे गेला?
आता कोविडकाळातील घोटाळे काढले जात आहेत. मात्र, तेवढेच नाही तर सर्व मनपातील घोटाळे बाहेर काढा असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले. या वेळी त्यांनी पीएम केअरमधील घोटाळादेखील समोर आणण्याचे आवाहन केले. पीएम केअर फंडात मिळालेला पैसा कुठे गेला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. रुग्णवाहिकेत झालेल्या घोटाळ्याबाबत तुम्ही बोलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.