संग्रहित छायाचित्र
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीची दुर्गमता बघून ज्या अभेद्य किल्ल्याच्या आधारावर स्वराज्य निर्माण केले, त्या किल्ल्यांची दखल आता युनेस्को घेणार आहे. राज्यातील शिवनेरी, रायगड, राजगड, साल्हेर, लोहगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळविण्यासाठी पाठविण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये युनेस्कोचे प्रतिनिधी या बारा किल्ल्यांच्या मूल्यमापनासाठी भेट देणार असल्याची माहिती राज्याचे पुरातत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाने यांनी ‘सीविक मिरर’ ला दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळवण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये रायगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांच्या मूल्यमापनासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात युनेस्कोची टीम किल्ल्यांना भेटी देणार आहे. या ऐतिहासिक क्षणी, सर्वांनी एकत्र येऊन आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन करण्याची गरज आहे. आजवर ज्यांनी गडकिल्ल्यांचे संवर्धन केले, त्यांचे संरक्षण केले, त्यांना एकत्र येण्याची हीच ती सुवर्णसंधी आहे. वरील काळात विविध उपक्रम राबवणार आहोत, ज्यामुळे गडकिल्ले अधिक सुंदर, अधिक भक्कम आणि सुरक्षित होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी, ज्या व्यक्ती, संस्थांनी गडकिल्ले संवर्धनासाठी काम केलेले आहे, तसेच काम करण्यास इच्छुक असलेले आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, तसेच रेस्क्यू टीमची माहिती तयार करीत आहे. यामुळे संबंधित सर्व संस्था, व्यक्तींनी माहिती भरून सहकार्य करण्याचे आवाहन वहाने यांनी केले आहे.
पुणे जिह्यात शिवनेरी, राजगड, लोहगड अशा किल्ल्यांसह राज्यात एकूण ३५० किल्ले आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला नियोजन विकास समितीमधून ३०० ते ३५० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासह तेथील इतर सोई सुविधा, सुशोभीकरणासाठी निधी वापरला जाणार असल्याचे वहाने यांनी सांगितले.
किल्ल्यांचे जतन व संवर्धन
जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) अंतर्गत राज्यातील गड- किल्ले, मंदिर व महत्त्वाची संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी तीन टक्के निधीचा विनियोग करण्यात येत आहे. यामध्ये गड-किल्ल्यांचे जतन-संवर्धन, देखभाल-दुरुस्ती, पर्यटक व भाविकांसाठी सोई-सुविधा, सुशोभीकरण करण्यात येत आहे.’’
३८६ स्मारके संरक्षित
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत ३८६ स्मारके संरक्षित म्हणून घोषित केलेली आहेत. यामध्ये धाराशीव लेणी, राजगड, सिंहगड, माणिकगड किल्ले गडजेजुरी, निरा-नृसिंहपूर, श्री तुळजाभवानी मंदिर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरुषांची जन्मस्थळे, गेट वे ॲाफ इंडिया अशा स्मारकांचा समावेश आहे. कातळात खोदलेल्या आणि जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा-वेरुळसारख्या लेण्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उभे राहिलेले राजगड, सिंधुदुर्ग किल्ले, यादव व मराठा काळातील दर्गे, मकबरे तसेच वसाहतकालीन स्थापत्यांचा समावेश आहे. ऐतिहासिक व पुरातन स्मारकांपैकी केंद्र सरकारव्दारे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मार्फत २८८ स्मारके राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून जतन केली आहेत.
राज्यातील शिवनेरी, राजगड, रायगड या किल्ल्यांसह बारा किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश करण्यासाठी पाठविले आहेत. त्याप्रमाणे युनेस्कोचे प्रतिनिधी सप्टेंबरमध्ये या किल्ल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी भेट देणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ’’
- विलास वहाने, उपसंचालक, पुणे राज्य पुरातत्त्व विभाग