शिवराज्याभिषेक सोहळा ३५० की ३४९ वा ?
#कोल्हापूर
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे नव्हे तर ३४९ वे वर्ष आहे. मात्र, पुढील वर्षीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ३४९ वा राज्याभिषेक सोहळा हाच ३५० वा सोहळा म्हणून साजरा करण्यात आला, असा गंभीर आरोप इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शुक्रवारी (दि. २) केला. यामुळे हा शिवराज्याभिषेक सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
किल्ले रायगडावर शुक्रवारी दिमाखदार सोहळा पार पडला. आजच्याच दिवशी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला, पण हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण काही जणांनी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं या वर्षी ३५० वे नाही तर ३४९ वे वर्ष आहे, असा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.
शिवराज्याभिषेकाचं हे ३४९ वे वर्ष असतानाही पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा ३५० वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जातातच कसे? स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवराज्याभिषेकाचा संबंध काय, अशा प्रश्नांच्या फैरी झाडत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती होती. रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी अवघ्या रायगडावर फुलांची आरास करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी फुलांनी सजवण्यात आले. महाराजांचा बसलेल्या स्थितीतील चांदीचा पुतळा पालखीसाठी सजवण्यात आला. या पालखी सोहळ्यासाठी अनेक नेतेमंडळी आणि मान्यवर उपस्थित आहेत. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी-जय शिवाजी' अशा घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.
सेवा करण्याची प्रेरणा शिवरायांकडून : मुख्यमंत्री शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य, त्यागाला मी अभिवादन करतो. स्वराज्य इतिहासाला आज ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा, असा आहे. या सोहळ्याला उपस्थित राहता येणे हे नशीबच आहे. राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळण्याचे कारण म्हणजे शिवरायांची प्रेरणा आहे. शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली ही पूजा म्हणजे हा आजचा सोहळा आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुर्ग प्राधिकरण हे सरकार स्थापन करेल, अशी घोषणा केली.प्रतापगड प्राधिकरण निर्माण केले जाईल. त्याचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील, असेही त्यांनी जाहीर केले. तसेच रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ४५ एकर जागेवर शिवसृष्टी उभारणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणादेखील त्यांनी केली.
सूर्य-चंद्र असेपर्यंत शिवरायांचे नाव राहणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
स्वराज्य म्हणजे काय, जाणते राजे काय असतात, हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे कळले. त्यांनी कधीही कोणाची तमा बाळगली नाही. जलसंधारणाचे धडे आजही आमच्यासाठी आदर्श आहेत. कायद्याची न्यायाची व्यवस्था आजही उपयुक्त ठरते. छत्रपती शिवराय नसते तर आम्ही कुठे असतो, हा विचारदेखील डोळ्यासमोर येतो. राज्य-व्यवहार मराठीत व्हावे म्हणून कोश तयार केला, त्यांचे जीवन आम्हाला आदर्श देणारे आहे. असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
इंद्रजीत सावंत काय म्हणाले?
‘‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ ला झाला. या राज्याभिषेकचा ३०० वा महोत्सव तत्कालीन राज्य सरकारने जून १९७४ मध्ये साजरा केला. यशवंतराव चव्हाण तत्कालीन अर्थमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रायगडावर जाऊन होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारच्या ‘लोकराज्य’ या अधिकृत मुखपत्रातही तसा उल्लेख आहे. त्यामुळे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ मध्ये व्हायला हवा,’’ असे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नमूद केले.
शिवरायांचे जीवन प्रेरणा देणारे : मोदींचा व्हीडीओ संदेश
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन प्रेरणा नवीन चेतना देणारा आहे. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण ही त्यांच्या शासन व्यवस्थेची मूलतत्त्वे राहिली आहेत. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर आज मोठा उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रवासियांना या सोहळ्यासाठी शुभेच्छा देत आहे. आझादीच्या अमृतमहोत्सव काळात शिवरायांचा राज्याभिषेक अद्भूत करणारा आहे,’’ असा शुभेच्छा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओद्वारे दिला.
वृत्तसंस्था