शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंनी नव्हे, अमित शहांनी फोडली

शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोडली, असा थेट आरोप ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १०) केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 11 Jun 2023
  • 12:49 am
शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंनी नव्हे, अमित शहांनी फोडली

शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंनी नव्हे, अमित शहांनी फोडली

संजय राऊत यांचा आरोप, आता शिंदे गटालाही संपवण्याची सुरुवात झाल्याचा दावा

#मुंबई

शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोडली, असा थेट आरोप ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि. १०) केला.

उद्धव ठाकरे यांनी काय भोगले, हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळेल. भविष्यात ते शिंदे गटालाही नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. अमित शहांचे हेच राजकारण आहे, असा दावादेखील संजय राऊत यांनी केला.

भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे पिता-पुत्रावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दाखवली. त्यामुळे प्रथमच भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्याचा संदर्भ देत पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, ‘‘अमित शहा, भाजपचे हेच राजकारण आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती का तोडली? हे शिंदे गटाला आता कळेल. भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी काय भोगले, याचा अनुभव आता शिंदे गटाला घेऊ द्या. कल्याण लोकसभेची जागा पूर्वी भाजपकडेच होती. मात्र, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ही जागा शिवसेनेकडे खेचून आणली. मात्र, आता शिवसेना फोडल्यानंतर भाजपला ही जागा हवी आहे.’’

शिवसेनेची मुंबई, महाराष्ट्रावरील पकड कमी करणे हे भाजपचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांना शिवसेना फोडायचीच होती. एकनाथ शिंदे यांची ताकद ४-५ आमदारांच्या पलीकडे नाही. अमित शहांनी त्यांच्या माध्यमातूनच शिवसेना फोडली. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पैसा, दहशत अशी सर्व हत्यारे अमित शहांनी वापरली. शिवसेना फोडून महाराष्ट्र कमजोर करण्यात आला. एकनाथ शिंदेंनादेखील ईडीची भीती होती. ते आदित्य ठाकरेंसमोर रडले होते. त्यांनी मन खंबीर ठेवावे, असे आमचे म्हणणे होते. मात्र, ते दबावाला बळी पडले, असे राऊत म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेऊ, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राहुल नार्वेकरांना खरे तर क्रांतिकारी निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, नियमांनुसार निर्णय घेतला तरी पुरेसे आहे. त्यांनी तसे केले तर आम्ही नार्वेकरांचा शिवतीर्थावर जाहीर सत्कार करू, असा चिमटा राऊत यांनी काढला.

 अमित शहांची नांदेडमध्ये सभा आहे. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील भाजप नेते कमजोर पडल्यामुळेच दिल्लीतील नेत्यांना वारंवार महाराष्ट्रात 

यावे लागत आहे. त्यांना इथे केवळ शिवसेनेचे कडवे आव्हान आहे’’ 

भाजप शिंदे गटाला एका-एका जागेसाठी रडवेल...

कल्याणमधून लोकसभेवर पूर्वी निष्ठावान शिवसैनिक खासदार म्हणून निवडून येत होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी ती जागा आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मागितली. उद्धव ठाकरे यांनी औदार्य दाखवत श्रीकांत शिंदेंना दोनदा तेथून खासदार म्हणून निवडून आणले, पण उद्धव ठाकरेंनी शिंदे पुत्राचे फाजिल लाड केले, हे नंतर कळाले. केवळ कल्याणच्या जागेसाठी नव्हे तर भाजप एका-एका जागेसाठी शिंदे गटाला असाच रडवेल आणि हळूहळू या पक्षाला नष्ट करून टाकेल. त्याची सुरुवात आता झाली आहे, असे राऊत यांनी आवर्जून सांगितले. 

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest